नवी दिल्ली दि. ८ – वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी अरूंद गल्ल्या, वाहतूक कोंडी, गर्दी आणि गल्ली बोळातील रूग्णांच्या सहाय्यासाठी भारतात दुचाकी अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी नेहमीच्या अॅम्ब्युलन्स जाऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी या अॅम्ब्युलन्स अतिशय उपयुक्त असून यूएस, यू.के., ऑस्ट्रेलिया आणि स्वीडनमध्ये ही सेवा अतिशय लोकप्रिय ठरली आहे.
या अॅम्ब्युलन्समधून रूग्णाला रूग्णालयात नेणे शक्य नसते मात्र रूग्ण असलेल्या ठिकाणीच जाऊन रूग्णावर प्रथमोपचार करण्यासाठी त्यांचा उपयोग गेला जातो. भारत सरकारने चार प्रकारच्या अॅम्ब्युलन्ससाठी मान्यता दिली असून त्यात या अॅम्बुलन्सचाही समावेश आहे. या वाहनात आवश्यक तपासणी यंत्रे, जीवनरक्षक औषधे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यांचा समावेश असतो. गंभीर अवस्थेतील रूग्णाला रूग्णालयात हलवेपर्यंत रूग्णाची काळजी या अॅम्बुलन्स घेऊ शकतात.
केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हेईकल रूल्सप्रमाणे ज्या अॅम्बुलन्स रेकमेंड केल्या आहेत, त्या नुसार ही वाहने पांढर्याू शुभ्र रंगाची, त्याचा अंतर्भाग जंतूंना अटकाव करणारा तसेच रूग्णवाहिका असेल तर आवश्यक यंत्रसामग्री सह तसेच ऑक्सिजनची व्यवस्था असलेला असणे बंधनकारक आहे. भारतात सध्या प्रवासी वाहनेच अॅम्ब्युलन्स म्हणून वापरली जातात. मात्र त्यात अनेक वेळा आवश्यक सुविधा नसतात तसेच वैद्यकीय आणीबाणी असेल तर त्यावेळी आवश्यक असलेली यंत्रे उपकरणेही त्यात नसतात. मात्र नवीन अॅम्ब्युलन्स वापरात आल्या तरी सध्याच्या अॅम्ब्युलन्सही कमी गंभीर रूग्णांसाठी वापरात ठेवल्या जाणार आहेत असेही समजते.