गोवा दि. ७- गोव्यात आजपासून सुरू होत असलेल्या भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीला ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी अनुपस्थित राहिले असून तब्येत बरी नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. आजच्या बैठकीत नरेंद्र मोदींच्या नावाची २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष प्रचार समितीचे प्रमुख म्हणून घोषणा करण्यात येणार होती. या घटनेने नाराज असलेल्या आडवानींनी म्हणूनच बैठकीस येण्याचे टाळले असल्याची चर्चा आहे. मात्र ते उद्या गोव्यात येणार आहेत असेही सांगितले गेले आहे.
दरम्यान आर एस एस नेही नरेंद्र मोदी यांच्या प्रचार समिती प्रमुख पदाला मान्यता दिली असल्याचे जाहीर केले आहे. येत्या ४८ तासात त्यासंबंधीची महत्त्वाची घोषणा केली जाईल असे सांगितले जात आहे. मात्र आडवानी आणि सुषमा स्वराज यांना मोदींनी या पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी थोडा वेळ मिळावा असा प्रयत्न चालविला असल्याचेही समजते.
११ वर्षांपूर्वी गोव्यातील भाजपच्या बैठकीतच मोदी यांना गुजराथचे मुख्यमंत्री बनण्यास आडवानी यांनी पाठिबा दिला होता. मात्र त्यावेळी मोदींच्या नावाला अटलजींचा विरोध होता. आज अटलजी कार्यरत नाहीत आणि आडवानी मोदींचे सर्वात मोठे विरोधक म्हणून समोर आले आहेत. गेल्याच आठवड्यात आडवानी यांनी मोदींच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी पक्षाची स्वतंत्र चिंतन बैठक घेण्याची मागणी केली होती आणि त्यात मोदींचा पुढचा मार्ग काय असेल यासंबंधी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
असे असले तरी पक्षाच्या प्रचार समितीचे प्रमख म्हणून आपल्या नावाची घोषणा त्वरीत केली जावी यासाठी मोदी आग्रही आहेत आणि त्यांना पक्षातील अन्य बर्यावच महत्त्वाच्या नेत्यांचा पाठिबाही आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही मोदींच्या निवडीचे समर्थन केले आहे.