पुणे – मंगळवारी राज्यातील काही भागात दाखल झालेला मान्सून हर्णे आणि सातारा परिसरात स्थिरावला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांनंतर मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, त्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होईल असे हवामान विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेघा खोले यांनी सांगितले. त्यामुळे अजून दोन दिवस तरी पावसासाठी बळीराजाला वाट पहावी लागणार आहे.
तळकोकणाबरोबरच दक्षिण मध्य महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून सध्या सातारा, हर्णे भागात स्थिरावलेला आहे. राज्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे डॉ. खोले यांनी स्पष्ट केले .
पुणे परिसराला दोन दिवसापूर्वी झोडपून काढलेल्या मान्सूनपूर्व पावसाने बुधवारी विश्रांती घेतली. पावसाने दांडी मारल्यामुळे शहर आणि परिसरात उकाड्याची तीव्रता वाढली होती. येत्या ४८ तासांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस मान्सून सक्रिय होण्याची वाट सर्वाना पाहवी लागणार आहे असे दिसते.