ढगांच्या गडगडाटासह ‘मुसळधार’ पुणेकरांना झोडपले

पुणे,दि.6: सध्या दररोज सायंकाळी मेघगर्जनेसह पडत असलेला पाउस हा मान्सूनपूर्व पाउस आहे की, मान्सूनचा पाउस आहे यावर ज्ञानी लोकात मतभेद आहेत पण तो पाउस पाण्याचा असल्याने सामान्य जनता अतिशय प्रसन्न आहे. दरम्यान, पुणे, मुंबई, मराठवाड्यात मान्सून सक्रिय झाला असल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहने बंद पडली, तर रस्त्यांवर झाडे कोसळल्याचेही प्रकार घडले. कार्यालये सुटण्याच्या वेळेत पाऊस आल्याने चाकरमान्यांची त्रेधातिरपिट उडाली. परंतु पावसाच्या हजेरीने गेल्या तीन महिन्यापासून उन्हाच्या झळा सोसणार्‍या पुणेकरांच्या आनंदाला आज उधाण आले. दिवसभर उकाडा सहन करणार्‍या नागरिकांना थंडगार गोठवणारी संध्याकाळ अनुभवायला मिळाली.

नैऋत्य मोसली पावसाने आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकचा अंतर्गत भाग , तेलंगणा, तटीय आंध्र, बंगाल उपसागराचा मध्यभाग मान्सूनने व्यापला आहे. आज तो पुणे, मुंबईमध्ये दाखल झाला असून पुढील 2 ते 3 दिवसात पूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. औरंगाबाद, परभणी, लातूर या मराठवाड्यातील जिल्ह्यासह पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा तर तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या काही भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गेल्या काही महिन्यांपासून दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येत्या 48 तासात राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून तापमान घट होणार असल्याचा अंदाज आहे.

Leave a Comment