इस्लामाबाद दि. ६- पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संसदेत केलेल्या पहिल्याच भाषणात पाकिस्तानवरचे ड्रोन हल्ले ताबडतोब थांबले पाहिजेच अशी गर्जना केली आहे. ते म्हणाले की अन्य देशांचे सार्वभौमत्व आम्ही मानतो आणि त्याचा आदर करतो तसेच आमच्या देशाचे सार्वभौमत्व अन्य देशांनी मान्य केले पाहिजे आणि आमच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे. त्यासाठी पाकिस्तानच्या भूमीवर होत असलेले ड्रोन हल्ले ताबडतोब थांबविले गेले पाहिजेत.
देशापुढे सध्या अनेक समस्या आहेत असे सांगून ते म्हणाले की कोणताच एक पक्ष या समस्यांसाठी पुरा पडू शकणार नाही. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत.यासाठी लवकरच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहे. परस्पर विचारांनीच देशाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच देशाचा कारभार पारदर्शक पद्धतीने आणि लोकशाही मार्गानेच चालविला जाईल असे मी जनतेला सांगू इच्छीतो.
देशाची अर्थव्यवस्था वर्णन करता येणार नाही इतकी रसातळाला गेली आहे. मात्र भ्रष्टाचार आम्ही सहन करणार नाही आणि भ्रष्टाचाराबाबत जर कुणी दोषी आढळला तर त्याची गयही केली जाणार नाही. देशाची आर्थिक स्थिती नाजुक असल्याने जनतेला कोणतीही स्वप्ने आम्ही दाखविणार नाही मात्र भारनियमन, कृषी, उद्योग आणि निर्यात या क्षेत्रांवर सर्वप्रथम लक्ष केंद्रित करून त्यात वेगाने विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहील. जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आहे तो सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही ते यावेळी म्हणाले.