जपानमध्ये ५०० किमीच्या वेगाने धावली बुलेट ट्रेन

टोकियो दि.६ – ताशी पाचशे किलोमीटर वेगाने धावणार्‍या बुलेट ट्रेनची पहिली चाचणी जपानमध्ये यशस्वी ठरली आहे. हवेवर तरंगणार्‍यां चुंबकीय ट्रॅक वरून धावणारी ही पहिलीच कमर्शियल ट्रेन असल्याचे समजते.

सेंट्रल जपान रेल्वे अधिकार्‍यांनी या ट्रेनची चाचणी करताना प्रंचड वेग असल्याने या चाचणीसाठीचा रेल्वे ट्रॅक ४३ किमीने वाढविला होता. पाच डब्यांच्या या ट्रेनचे इंजिन सुरवातीस संथ गतीने रूळांवरून धावले मात्र नंतर त्याने हवेतून नियोजित ५०० किमी वेगाने प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला असे रेल्वे अधिकार्‍यांनी जाहीर केले.

२०२७ पर्यंत चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर करून जपानची ही बुलेट ट्रेन टोकियो ते नायामा हे अंतर ४० मिनिटांत पूर्ण करेल असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळेपर्यंत या ट्रेनला १६ डबे असतील आणि १ हजार प्रवासी त्यातून प्रवास करू शकतील.२०४५ पर्यंत हीच ट्रेनओसाका पर्यंत धावेल आणि नंतर संपूर्ण जपानभर याच पद्धतीने रेल्वे धावतील असे सांगण्यात आले आहे.