चार वर्षात निम्मे जग इंटरनेट कनेक्ट होणार

नवी दिल्ली दि.६ -नेटवर्कींग कंपनी सिस्कोने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार आणखी चार वर्षात म्हणजे २०१७ सालापर्यंत जगातील निम्मी लोकसंख्या इंटरनेट कनेक्ट होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सध्या इंटरनेट कनेक्ट नागरिकांचे प्रमाण ४८ टक्के इतके आहे.

सिस्कोच्या अहवालानुसार जागतिक स्तरावर २०१७ पर्यंत इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या ३.६ अब्जांवर पोहोचेल तर त्यावेळी जगाची लोकसंख्या असेल ७ .६ अब्ज. २०१२ मध्ये इंटरनेट कनेक्ट नागरिकांची संख्या २ .३ अब्ज होती तर जगाची लोकसंख्या होती ७ .२ अब्ज. विशेष म्हणजे अन्य देशांच्या तुलनेत भारतातील इंटरनेट कनेक्ट नागरिकांची संख्या सर्वाधिक वेगाने वाढते आहे असेही या निरीक्षणातून दिसून आले आहे.

भारतात २०१७ सालात इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या ३४.८ कोटींवर जाईल असाही सिस्कोचा अंदाज आहे. या काळात भारतात इंटरनेटचा वापर २.५ एक्साबाईट प्रतिमहिना जाण्याची शक्यता आहे. २०१२ सालात हाच वापर प्रति महिना ३९३ पेटाबाईट इतका होता. १ एक्साबाईट म्हणजे १० लाख टेराबाईट असे प्रमाण आहे.