स्पॉट फिक्सिंगमागे दाऊद आणि शकीलच

नवी दिल्ली – आयपीएल फिक्सिंग प्रकरणात अंडरवर्ल्डपासून बुकी-खेळाडूंपर्यंत अनेकांचा समावेश असून ही संघटित गुन्हेगारीच असल्याचे पोलिस अधिका-यांचे म्हणणे आहे.‍ खेळाडूंविरोधात बळाचा तसेच , धमक्या आणि दबावाचा वापर करण्यात आला. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेले एस. श्रीशांतसह अन्य दोन खेळाडू हे कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम आणि त्याचा साथीदार छोटा शकील यांच्या इशा-यावर काम करत होते , अशी माहिती दिल्ली पोलिसांनी मंगळवारी येथील अडिशनल सेशन्स कोर्टापुढे दिली. दरम्यान अंडरवर्ल्डशी असलेले संबंध समोर आल्याने श्रीशांत, चंडिलासह २३ आरोपींविरोधात ‘ मोक्का ‘ लावण्यात आला आहे.

या प्रकरणातील संघटित गुन्हेगारीचे जाळे स्पष्ट झाले आहे. श्रीशांत आणि अन्य आरोपींचा दाऊद कंपनीशी संबंध असल्याचे सिद्ध करणारे टेलिफोन इंटरसेप्ट तसेच , या संबंधांचे अन्य सबळ पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला. आयपीएल मॅचेस ‘ फिक्स ‘ करण्यासाठी बुकींनी दुबईसह पाकिस्तानातील कराची आणि अन्य शहरांमध्ये फोन केले होते , ही बाब टेलिफोन इंटरसेप्टवरून स्पष्ट होते , अशी माहिती वरिष्ठ अधिका-याने दिली.

अटकेत असलेल्या एका बुकीने एका खेळाडूला ‘ मुंबईत आल्यावर धडा शिकवेन ,’ असे धमकावले होते , असे पोलिस अधिकाऱ्याने कोर्टाला सांगितले. अंडरवर्ल्डशी असलेले संबंध समोर आल्याने श्रीशांत , चंडिलासह २३ आरोपींविरोधात ‘ मोक्का ‘ लावण्यात आला आहे. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या कडक कायद्याचा अवलंब केला जातो. ‘ मोक्का ‘ अंतर्गत आरोप सिद्ध झाल्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

दरम्यान , या प्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडीत १८ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान , फिक्सिंग प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी एका आयपीएल टीमची माहिती मिळवण्यासाठी हैदराबादस्थित व्यक्तीचा शोध दिल्ली पोलिस घेत आहेत. हैदराबादहून अटक केलेला बुकी याह्या महम्मद याच्याकडून या व्यक्तीची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी अटक करण्यात आलेले चेन्नई सुपर क‌िंग्ज टीमचे प्रिन्सिपल गुरुनाथ मैयप्पन आणि अभिनेता विंदू दारासिंगला मंगळवारी कोर्टाने सशर्त जामीन दिला. २५ हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि भारताबाहेर न जाण्याच्या अटीवर दोघांना जामीन देण्यात आला.

या प्रकरणात अंडरवर्ल्डपासून बुकी आणि खेळाडूंपर्यंत अनेकांचा समावेश असलेल्या संघटित गुन्हेगारीचा हात आहे. खेळाडूंविरोधात बळ , धमक्या आणि दबावाचा वापरही करण्यात आला. एका बुकीशी संबंधित अशा दोन प्रकरणांची कोर्टानेही दखल घेतली आहे. आरोपींना पैसेही मिळाले , असे एका अधिका-याने सांगितले. याबाबत अधिक खुलासा मागितला असता , अटकेत असलेल्या एका बुकीने एका खेळाडूला ‘ मुंबईत आल्यावर धडा शिकवेन ,’ असे धमकावले होते , असे संबंधित अधिकारी म्हणाला.

Leave a Comment