नवी दिल्ली दि.५ – जागतिक सर्व्हीस फर्म टॉवर्स वॉटसन यांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतील कंपन्यात नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्याचे प्रमाण जगात सर्वाधिक म्हणजे १४ टक्के इतके आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना आपले कुशल कर्मचारी टिकवून ठेवणे आणि त्यांनी नोकरी सोडू नये यासाठी त्यांना आमिषे दाखविणे अशी कसरत करण्याची वेळ आली आहे.
टॉवर्स वॉटसनच्या अहवालानुसार जगात नोकऱ्या बदलण्याचे प्रमाण ११.२० टक्के इतके असून आशिया पॅसिफिक भागात हेच प्रमाण १३.८१ इतके आहे. भारतातील ९५ टक्के कंपन्यांनी त्यांच्याकडील अतिकुशल कर्मचारी टिकवून ठेवणे त्यांना फारच त्रासाचे होत असल्याचे मान्य केले आहे तर ७५ टक्के कंपन्यांनी कर्मचाऱ्याना टिकवून ठेवण्यासाठी अनेक आकर्षक योजना सातत्याने अमलात आणाव्या लागत असल्याचे कबूल केले आहे. भारतीय कर्चमारी रोजगार सुरक्षा आणि करियरमध्ये अधिक वाव या दोन बाबींना प्रामुख्याने महत्त्व देतात असेही या अहवालात म्हटले गेले आहे.