नवाझ शरीफ यांचा पंतप्रधानपदी आज शपथविधी

इस्लामाबाद दि.५ – विक्रमी तीन वेळा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी पाकिस्तान मुस्लीम लिग -एनचे प्रमुख नवाझ शरीफ यांना मिळाली असून आज म्हणजे बुधवारी ते पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. पाकिस्तानच्या संसदेत ३४२ जागा असून त्यापैकी १८० जागा शरीफ यांच्या पक्षाने नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत जिकल्या आहेत.

६३ वर्षीय नवाझ शरीफ यांचा पंतप्रधानपदाचा अर्ज त्यांचे पक्षातील सहकारी इशाक दर, ख्वाजा असीफ आणि अब्दुल बलूच यांनी मंगळवारीच सादर केला आहे. शरीफ यांच्याविरोधात तेहरीक ए इन्सान पक्षाचे जावेद हाश्मी आणि पाकिस्तान पिपल्स पार्टीचे मकदूम अमीन फाहीज यांनीही अर्ज दाखल केले आहेत. मात्र बहुमत असल्याने शरीफ यांची निवड नक्की आहे.

शरीफ यांच्या शपथविधीसोबतच मंत्रीमंडळाचा शपथविधी होण्याचीही शक्यता आहे. मात्र सध्या मंत्रीमंडळाचा आकार अगदीच कमी ठेवण्यात येणार असून रमझान नंतर मंत्रीमंडळ विस्तार केला जाईल असे त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. सध्या आठ ते दहाच मंत्री नेमले जातील आणि त्यातही परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण ही दोन्ही महत्त्वाची खाती स्वतःकडेच ठेवतील असेही सांगण्यात येत आहे.