मोदींच्या नेतृत्वाला आडवानींकडून हिरवा कंदिल

नवी दिल्ली दि.५ – आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपचे प्रचार समिती प्रमुख म्हणून गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यास ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांनी अखेर हिरवा कंदिल दाखविला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पक्षाच्या गोव्यात होत असलेल्या बैठकीत मोदी यांच्या नावाची घोषणा केली जाईल असे समजते.

पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्यावरून भाजपमध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहेच. त्यातच प्रचार प्रमुख म्हणून मोदींच्या नावाला आडवानी यांचा विरोध होता हेही सर्वश्रुत आहे. त्यातच आडवानी यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिग चौहान मोदींपेक्षा अधिक कर्तृत्ववान असल्याचे नुकतेच म्हटले होते. मात्र भाजपमधील अनेक नेत्यांनी आगामी काळात चार राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आणि मोदींना देशाच्या सर्व थरांतून असलेला पाठिंबा आणि त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांचीच प्रचार प्रमुखपदी निवड करण्याचा आग्रह धरला होता असेही समजते.

या संदर्भात आडवानी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांची चर्चा झाल्यानंतर आडवानी यांनी मोदींच्या नावाला होकार दिला आहे मात्र त्याचवेळी चार राज्यात होत असलेल्या विधाससभांसाठी अन्य सदस्यांची स्वतंत्र निवडणूक व्यवस्थापन समिती नेमण्यात यावी असेही राजनाथसिंह यांना सांगितले आहे. दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्या लोकसभा निवडणुकांपूर्वी पार पाडल्या जातील असा अंदाज आहे.

Leave a Comment