सचिनच्या हस्ते ‘सत ना गत’चे म्युझिक लॉन्च

मराठी मनाचा कंठमणी असलेल्या सचिन तेंडुलकरच्या हस्ते ‘सत ना गत’च्या संगीताचे प्रकाशन मुंबईत रंगशारदा येथे मोठया थाटात झाले. सचिनचे वडीलबंधू कवी नितीन तेंडुलकर यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलेलं आहे आणि आपल्या भावाच्या या पहिल्याच फिल्मी गीताचं कौतुक करण्यासाठी सचिन आवर्जून उपस्थित होता. प्रेक्षकांच्या साथीने संगीत प्रकाशन ही आपली परंपरा देविशा फिल्म्सने याहीवेळेस कायम ठेवली असून ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’प्रमाणेच ‘सत ना गत’चं संगीतही प्रेक्षकांच्या साक्षीने एका शानदार सोहळ्यात प्रकाशित करण्यात आलं.

देविशा फिल्म्सचे अध्यक्ष (चेअरमन) अभिजीत घोलप हे एक यशस्वी उद्योजक आहेतच, पण त्यांनी चित्रपट निर्माते म्हणून आपल्या नव्या इनिंग्जला सुरुवात केली तेव्हा त्यांनी चित्रपटनिर्मिती हा केवळ उद्योग मानला नाही तर त्यातून सामाजिक भान जपण्याचाही जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यातूनच ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ यांसारख्या आशयघन करमणूकप्रधान चित्रपटांची निर्मिती झाली. सध्या आपल्या अवतीभवती, प्रसारमाध्यमांमधून महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या सतत येत असतात. आपला समाज जणू स्त्रीचा योग्य सन्मान करणंच विसरला आहे. एका रात्रीत हे चित्र बदलणं शक्य नसलं तरी किमान स्त्रीकडे बघण्याची दृष्टी समाजाने बदलावी, यासाठी प्रयत्न निश्चित करता येतील. ‘सत ना गत’च्या पाठीशी ‘देविशा फिल्म्स’ने पाठबळ उभं केलं ते याच भावनेतून. याच प्रयत्नांचा पुढील टप्पा म्हणून ‘देविशा फिल्म्स’तर्फे ५ जुलै हा दिवस ‘महिला सन्मान दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. या माध्यमातून समाजापुढे एक आदर्श ठेवण्याचा ‘देविशा फिल्म्स’चा प्रयत्न असून या मोहिमेची सुरुवातही आजच्या कार्यक्रमातून करण्यात आली.

समाजासाठी आदर्श ठराव्या अशा ५ कर्तृत्ववान महिलांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. पर्यटन उद्योगात मराठीचा झेंडा अटकेपारच नव्हे तर साता समुद्रापार फडकवणाऱ्या वीणा पाटील, महिला दिग्दर्शकांकडे बघण्याची दृष्टी बदलून टाकणाऱ्या आणि आज एका मनोरंजन वाहिनीची धुरा सांभाळणाऱ्या श्रावणी देवधर, भारतीय उद्योग क्षेत्रातील पहिल्या महिला सीईओ पद्मश्री लीला पूनावाला, स्टेम सेल संशोधनात विशेष प्राविण्य मिळवलेल्या डॉ. दीप्ती देवबागकर आणि चीनमधील अत्यंत खडतर गोबी वाळवंट पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला असण्याचा मान मिळवणाऱ्या सुचेता कडेठाणकर यांना याप्रसंगी गौरवण्यात आलं.

‘सत ना गत’ ही राजन खान यांची गाजलेली कादंबरी. या कादंबरीतला काळ आहे १९९२चा. एका शांत, देखण्या गावात १९९२ साली घडलेल्या घटनेचे राजकीय आणि सामाजिक पडसाद कसे उमटले, याचं चित्रण या चित्रपटात आहे. साईशंकर फिल्म्सची निर्मिती असलेला ‘सत ना गत’ हा चित्रपट देविशा फिल्म्स प्रस्तुत करत असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment