केकेआरच्या मैसूरचे विंदूने घेतले नाव

मुंबई – आयपीएएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरण दररोज नवनवीन वळण घेत आहे. या प्रकरणी जेलची हवा खात असलेल्या अभिनेता विंदू दारासिंगने बेटिंग प्रकरणात चेन्नई आता कोलाकाता नाइट रायडरचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) वेंकी मैसूर यांचेही नाव घेतले आहे. पोलिसांनी बेटिंगसंदर्भात माहिती गोळा करण्यासाठी मैसूर यांच्याशी संपर्क साधला आहे. विंदूने पोलिस चौकशीत मैसूर यांचे नाव सांगितल्याने या प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले आहे.

अभिनेता विंदू दारासिंग खेळाडू आणि टीमची माहिती मिळवण्यासाठी अनेकजणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याने कोलकाता नाइट रायडरचे एमडी वेंकी मैसूर यांच्याशीही संपर्क केला होता, असे गुन्हे नियंत्रण विभागाच्या पोलिसांनी सांगितले. मात्र, वेंकीकडून उपयुक्त माहिती मिळाली नाही, असेही विंदूने स्पष्ट केल्याचे पोलिसांनी सांगितले. विंदू अनेकांच्या संपर्कात होता आणि त्यातील प्रत्येकजण बेटिंगमध्ये सहभागी झाला असेलच असे नाही, असे वरिष्ठ अधिका-यांनी स्पष्ट केले. दरम्यान या प्रकरणी मैसूर यांचीही चौकशी होऊ शकेल असे समजते.

दरम्यान बेटिंग प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी किशोर बदलानी उर्फ केसू पुणे या नामचिन बुकीला सोमवारी विमानतळावर अटक केली. आयपीएलमधील बेटिंग प्रकरणे बाहेर पडल्यानंतर पुण्यातील किशोर बदलानी युरोपमध्ये गेला होता. मुंबई विमानतळावरच त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून या फोनवरून तो बेटिंग घेत असल्याचा आरोप आहे. त्याच्या चौकशीतून पाकिस्तानमधील बुकींशी होणारी चर्चा उघड होणार आहे.

Leave a Comment