नवी दिल्ली – माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांची मंगळवारी बढती घोटाळा प्रकरणी सीबीआय चौकशी होणार आहे. सीबीआयने बन्सल यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर होण्याचे समन्स बजावले आहे. काही दिवसापुर्विंच बढती घोटाळा प्रकरणी पवनकुमार बन्सल यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनाम्यानंतर बन्सल यांची चौकशी होत असल्याने याला महत्व प्राप्त झाले आहे.
माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचा भाचा विजय सिंगला याला काही दिवसांपूर्वी लाच घेताना एका रेल्वे अधिका-यासह अटक करण्यात आली होती. दोघांची चौकशी केल्यानंतर रेल्वेत बढती आणि महत्त्वाच्या पदावरील नियुक्तीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याची माहिती उघड झाली.
सिंगला अर्थपूर्ण व्यवहार करतो आणि रेल्वेमंत्री असलेल्या मामा मार्फत बढती मिळवून देतो अशा स्वरुपाची माहिती सीबीआयने जाहीर केली. या माहितीमुळे गदारोळ झाला आणि रेल्वेमंत्री बन्सल यांना राजीनामा द्यावा लागला होता. या राजीनाम्यानंतर बन्सल यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत होती. राजीनाम्यानंतर बन्सल यांची चौकशी होत असल्याने त्यामधून आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.