मुंबई दि. ४- इंग्रजी वर्तमानपत्रे खपाबाबत अनेक अडचणींचा सामना करत असताना हिंदी, मराठी, तेलगू, मल्याळी अशी प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रे मात्र जोरात खपत असल्याचे ऑडीट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशनच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जगात वर्तमानपत्र व्यवसायाचा जो ट्रेंड आहे त्याच्या बरोबर विरूद्ध ट्रेंड भारतात असल्याचेही सिद्ध झाले आहे.
ब्युरोच्या अहवालानुसार २००६ ते २०१२ या काळात पेड कॉपीजची संख्या १ कोटीने वाढून ती सुमारे पाच कोटींवर गेली आहे. यात अनपेड सक्र्युलेशन मिळविले तर ही संख्या तब्बल १० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे जगात भारत याबाबत दुसर्या क्रमांकावर असून चीनचा नंबर येथेही पहिला आहे.
ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन विविध पब्लीकेशन्सच्या ६७८ आवृत्त्यांना सर्टिफाय करत असते. वर्तमानपत्राचा विचार करताना त्याच्या निघत असलेल्या प्रती आणि वाचक असा दोन्ही बाबींचा विचार करावा लागतो. वाचकसंख्येचा विचार केला तर इंग्रजी वर्तमानपत्रांची वाचक संख्या प्रादेशिक वर्तमानपत्रांच्या वाचकसंख्येच्या तुलनेत कमी वाढली आहे. तसेच इंग्रजी पेपर वाचनासाठी दिला जाणारा वेळही ६.५ टक्कयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आता या वर्तमानपत्रांनी डिजिटल मार्गाचा विचार केला नाही तर त्यांची अवस्था अमेरिकन वर्तमानपत्रांप्रमाणे होण्याची शक्यता ब्युरोतील तज्ञांनी वर्तविली आहे.
प्रादेशिक वर्तमानपत्रांचा विचार करताना हिंदी, मराठी, मल्याळी आणि तेलगू या भाषेतील वर्तमानपत्रांची संख्या तसेच वाचकसंख्याही वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातही वर्तमानपत्र विकत घेऊन वाचण्याकडेही वाचकांचा कल वाढू लागला आहे. विशेष म्हणजे इंग्रजी वर्तमानपत्रांच्या तुलनेत प्रादेशिक वर्तमानपत्रांची किंमत जास्त असूनही वाचकांनी त्यांना अधिक पसंती दिल्याचे दिसून येत आहे.