लंडन दि.४ – स्वीडनला हस्तांतरण केले जाऊ नये यासाठी ब्रिटनमधील इक्वेडोरच्या दूतावासात गेले वर्षभर आश्रयास असलेल्या ज्युलियन असांजे प्रकरणात इक्वेडोरचे परराष्ट्रमंत्री रिकार्डो पटीनो ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री हेग यांची १७ जून रोजी भेट घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याचवेळी ते असांजेलाही भेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या भेटीच्या वेळी असांजेच्या बाबत कांही तोडगा निघतो का याबाबत चर्चा केली जाणार असल्याचेही समजते.
गेले वर्षभर ज्युलियन असांजेने या दूतावासात आश्रय घेतला आहे. ब्रिटनने त्याचे स्वीडनला हस्तांतरण करण्याचा करार केला आहे. इक्वेडोरने त्याला राजाश्रय दिला आहे मात्र ब्रिटनने त्याला सेफ पॅसेज देण्यात येणार नाही असे जाहीर केले आहे. अमेरिकेचा कट्टर विरोधक असलेल्या असांजेने विकिलिक्स या त्याच्या साईटवरून अमेरिकेची लष्करासंबंधीची लक्षावधी कागदपत्रे उघड केली आहेत. त्यामुळे स्वीडनला हस्तांतरण केले तर त्याला अमेरिकेत पाठविले जाईल आणि तेथे मृत्युदंडाची शिक्षा दिली जाईल अशी भीती असांजेने व्यक्त केली आहे. असांजेच्या मते त्याने कांहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे त्याचे हस्तांतरण केले जाऊ नये अशी त्याची मागणी आहे. आणि त्यासाठीच त्याने इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतलेला आहे.