मूर्ती येताच इन्फोसिस शेअर उसळला

नवी दिल्ली दि.३ – इन्फोसिसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्रे नारायण मूर्तींनी हाती घेताच सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडला तेव्हा इन्फोसिसच्या शेअरमध्ये नऊ टक्के वाढ झाल्याने दिसून आले आहे. यामुळे निफटी बेंचमार्कवर ज्या टॉप ५० कंपन्या आहेत त्यात इन्फोसिस टॉप गेनर बनला असल्याचे समजते.

यावर्षी इन्फोसिसचे महसूल निकाल असमाधानकारक लागले होते आणि परिणामी त्यांचा बाजारातील व्यवसाय हिस्साही कमी झाला होता. संकटकाळाचा सामना करत असलेल्या कंपनीने संस्थापक नारायण मूर्ती यांना पुन्हा पाचारण करून कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर सोपविली. भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील यशाचे पायोनिअर अशी नारायण मूर्ती यांची ओळख आहे. त्यांनी सूत्रे हाती घेताच त्याचा त्वरीत परिणाम कंपनीचा शेअर सुधारण्यावर झाला.

६७ वर्षीय मूर्ती यांनी १९८१ साली अवघ्या ६ अभियंत्यांसह इन्फोसिस कंपनी सुरू केली आणि सुरवातीला २५० डॉलर्स महसूलही मिळविला. त्यानंतरच्या काळात कंपनीने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि आज कंपनीचा महसूल ७ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. मूर्ती यांनी ऑगस्ट २०११ साली निवृत्ती घेतली होती. मात्र कंपनी अडचणीत आल्याने त्यांनी पुन्हा सूत्रे हाती घेतली असून पुढृील पाच वर्षे ते ही जबाबदारी निभावणार आहेत.

Leave a Comment