क्रिस्टीनाने शिकून घेतली हिंदी भाषा

धर्मेंद्रचे प्रॉडक्शन हाऊस विजेयता फिल्मची निर्मिती असलेल्या यमला पगला दिवाना या चित्रपटाचा सिक्वल बनून तयार असून लवकरच सिनेमा शौकिनांच्या भेटीसाठी तो रूपेरी पडद्यावर येणार आहे. धर्मेंद्र, सनी देओल व बॉबी देओल या तिघा बापलेकांची जुगलबंदी दाखविणार्‍या या चित्रपटाची प्रेक्षकांना जेवढी उत्सुकता आहे, तेवढीच त्यामध्ये सनीच्या नायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रिस्टीना अकिवाही आतुरतेने वाट पाहत आहे.

ऑस्ट्रेलियाची निवासी असलेल्या क्रिस्टीनाचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून यामुळे तिचे बर्‍याच दिवसांचे स्वप्न वास्तवात येणार आहे. बॉलीवूडमध्ये येण्यासाठी देव पाण्यात बुडवून ठेवणार्‍या क्रिस्टीनाने सदाबहार हिरो धर्मेंद्र व त्याच्या कुटुंबासोबत काम करण्यासाठी अवघ्या सहा महिन्यांत हिंदी शिकून घेतली आहे. पहिल्यांदाच भारतीय चित्रपटात काम करत असलेली ही अभिनेत्री यमला पगला दिवाना-२ बाबत प्रचंड उत्साहित आहे.

या चित्रपटासंबंधीचा आपला अनुभव कथन करताना ती सांगते की, सुरुवातीस हिंदीतील लिपी पाहून तिला भलतीच भीती वाटली होती, पण ही भाषा शिकण्याचा प्रयत्न केल्यावर व तिच्यातील अक्षरांची ओळख झाल्यानंतर त्यांचा उच्चार करण्यात भलतीच मजा असल्याचे तिच्या लक्षात आले. अशी गंमत अन्य कोणत्याच भाषेत नसल्याचेही क्रिस्टीनाने आवर्जून नमूद केले.

धर्मेंद्रजींसोबत काम करण्याची आपली ही पहिलीच वेळ आहे. या वयातही त्यांची ऊर्जा थक्क करणारी आहे, असे ती सांगते. क्रिस्टीनाचा जन्म रशियात झाला आहे, पण तिचे पालनपोषण आणि शिक्षण सगळे काही ऑस्ट्रेलियात झाले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंगद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या या अभिनेत्रीने एफटीव्हीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये हिस्सा घेतला आहे. मॉडेलिंगसोबतच क्रिस्टीनाने ऑस्ट्रेलियन रंगभूमीवरही अनेक नाटकांत काम केलेले आहे. तिला अभिनयाचा बर्‍यापैकी अनुभव असला तरी चित्रपटाच्या चित्रणादरम्यान सनी व बॉबी यांनी आपल्याला प्रत्येक वेळी समजून घेत मोठी मदत केली, असेही तिने नम्रपणे सांगितले.

Leave a Comment