संगणक अथवा स्मार्टफोन, टॅब्लेट हा आजचा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. एकवेळ जेवण खाण नसले तरी चालेल मात्र ही उपकरणे हवीतच. तरूणाईला तर ही उपकरणे म्हणजे अल्लादिनचा जादूई चिरागच वाटत असतात. कारण बसल्याजाग्याहून अनेक कामे अगदी बँकींग, बिले भरण्यापासून सर्व या उपकरणांच्या सहाय्याने करता येतात. मात्र अनेक अकौंट असली की त्यासाठी वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवावे लागतात आणि पासवर्ड विसरला की सगळीच पंचाईत होते. शिवाय पासवर्ड हॅक होईल या भीतीने ते सारखे बदलले जातात आणि मग लक्षात राहात नाहीत.
अमेरिकन जायंट मोटोरोला ने अशा विसराळू ग्राहकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनी असे एक नवीन हटके तंत्रज्ञान तयार करत आहे की ज्यामुळे पासवर्डची भानगडच राहणार नाही. कंपनी माणसाच्या त्वचेला चिकटून राहणारे इलेक्ट्रोनिक टॅट्यू तयार करते आहे. हे टॅट्यू सर्कीटसह माणसाच्या त्वचेला चिकटलेले असतील आणि जेव्हा स्मार्टफोन, टॅब्लेट अथवा संगणक वापरायचा असले तेव्हा हा टॅट्यूच पासवर्डचे काम करेल.
कंपनीने टॅट्यू प्रमाणेच पासवर्ड गोळी तयार करण्याचाही विचार चालविला आहे. ही गोळी युजरने गिळायची आहे. या गोळीत असलेल्या सर्कीटमुळे शरीराबाहेर असलेल्या उपकरणांना सिग्नल मिळू शकणार आहे व हा सिग्नल मिळाला की पासवर्ड न वापरताच संगणक वापरता येणार आहेत. या गोळीला बॅटरीची गरज नाही कारण पोटातील अॅसिडमधून ही गोळी चार्ज केली जाणार आहे असे समजते.
अर्थात ही दोन्ही तंत्रज्ञाने प्रत्यक्षात येण्यास आणखी काही अवधी जावा लागणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.