ये जवानी है दिवानी

वेकअप सिद’ नंतर अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र आले आहेत. ‘यह जवानी है दिवानी’च्या निमित्ताने. अयानच्या या चित्रपटात काहीही नवीन नसले तरी चित्रपटाच्या कथानकाचे सादरीकरण उत्तम पद्धतीने केले आहे.सादरीकरण हाच ‘यह जवानी है दिवानी’चा युएसपी आहे.
‘यह जवानी है दिवानी’एका तरुणाच्या आणि तरुणीच्या प्रेमसंबंधावर आधारित आहे. कबीर थापर ऊर्फ बनी (रणबीर कपूर) एक मध्यमवर्गीय घरातला थोडासा बिघडलेला मुलगा आहे. बर्‍याच तरुणांप्रमाणे त्याचाही विवाहपद्धतीवर विश्‍वास नाही. तो आपले वडील (फारुख शेख) आणि सावत्र आई (तन्वी आझमी) सोबत राहतोय. अवि (आदित्य रॉय कपूर) आणि अदिती (कल्की कोचलिन) बनीचे सर्वांत जवळचे मित्र. ट्रेकिंगला मनाली येथे जाताना या सर्वांची नैनाशी (दीपिका पदुकोन) भेट होते.

नैना त्यांची शाळेतली ्नलासमेट आहे, मात्र त्यांच्यात फरक आहे. नयनाची ओळख स्कॉलर नैना अशी आहे, तर हे तिघे बॅकबेंचर्स आहेत. मनालीला जातानाच्या प्रवासात नैना आणि बनीच्या तारा जुळायला लागतात. स्कॉलर असलेली नैना ट्रीप एन्जॉयकरते. एक दिवस नैना बनीसमोर आपलं प्रेम व्यक्त करण्याच्या तयारीत असते आणि तेव्हाच तिला माहिती मिळते की बनीला शिकागो विद्यापीठात जर्नालिझमच्या अभ्यासाठी स्कॉलरशिप मिळाली आहे. बनीला मिळालेली संधी गमवायची अजिबात इच्छा नाही. कारण जगाच्या कानाकोपर्‍यात फिरायला जाणे, हे त्याचे स्वप्न आहे आणि या स्कॉलरशिपमुळे ते पूर्ण होणार आहे.

त्यामुळे तो शिकागोला निघून जातो आणि तब्बल आठ वर्षानंतर अदितीच्या लग्नासाठी बनी भारतात परततो. इथं त्याची पुन्हा एकदा नैनाशी भेट होते. जुनं प्रेम पुन्हा एकदा उफाळून येतं. पण, यावेळेस मात्र नैना स्वत:ला सावरते कारण बनीला तर संपूर्ण जग फिरायचंय आणि नैनाला तर तिचं कुटुंब सोडायचं नाही. पुढे कायहोतं, हे रजतपडद्यावर पाहणेच इष्ट.

अयान मुखर्जीने ‘यह जवानी है दिवानी’ मध्ये दोन भिन्न मते मांडणार्‍या आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे जगणार्‍या लोकांचे भिन्न विचार खूप सुंदर पद्धतीनं मांडले आहेत. जे आपले काम स्वतः निवडतात. एक तर ते आयुष्यभर कुणासाठी तरी काम करतात, किंवा स्वतःचेच एखादे नवीन काम सुरू करतात. ज्यामध्ये अपयश मिळण्याचीही बरीच शक्यता असते. या चित्रपटात सुद्धा हाच पेच दाखवण्यात आला आहे. हीच गोष्ट या चित्रपटाला खास बनवते. काही जागा थोड्या बोअरिंग वाटतात तर काही दृश्यं प्रेक्षकांच्या मनावर परिणाम करून जातात.

वास्तविक जीवनातील ब‘ेकअपनंतर तब्बल पाच वर्षांनी रणबीर आणि दीपिका एकाच चित्रपटात आले आहेत. पण, दोघांच्याही कामाला, मेहनतीला आणि केमिस्ट्रीला दाद द्यावी लागेल. पडद्यावर रणबीर आणि दीपिकाची केमिस्ट्री सॉलिड जमली आहे. दोन्ही कलाकारांचा अभिनय दिवसेंदिवस अधिक उठावदार होत आहे. दोघांच्या केमिस्ट्रीमुळे ‘यह जवानी है दिवानी’ला चार चाँद लागले आहेत. धकधक गर्ल माधुरी दीक्षित ‘घागरा’मध्ये भाव खाऊन गेली आहे. मनालीचा सुंदर निसर्ग आणि वातावरण कॅमेर्‍यात उत्तमरित्या कैद करण्यात आलंय. संगीतकार प्रीतमनं पुन्हा एकदा कानाला गोड वाटेल असंच संगीत दिलंय. ‘बलम पिचकारी’ आणि बदतमीज दिल’ ही दोन गाणी तर अगोदरच हिट झाली आहेत. अयान मुखर्जीने वेकअप सिद नंतर पुन्हा एक सुंदर कलाकृती आपल्यासमोर आणली आहे.

चित्रपट – यह जवानी हैं दीवानी
निर्माता – करण जोहर
दिग्दर्शक – अयान मुखर्जी
संगीत – प्रितम
कलाकार – :रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, कल्की कोचलिन, आदित्य रॉय कपूर.

रेटिंग – * * *

Leave a Comment