सोने आणखी घसरणार

नवी दिल्ली दि .१ – सोन्याचे सध्याचे दर आगामी कांही दिवसांत आणखी किमान दोन हजार रूपयांनी उतरतील असा अंदाज असोकेमच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. सोन्याचे दर घसरणार असले तरी ते १० ग्रॅमला २५ हजारांच्या खाली जाण्याची शक्यता कमी असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सोन्याचे अॅसेट म्हणून असलेले आकर्षक नक्कीच कमी झाले असले तरी दर उतरताच खरेदीदारांचा सोने खरेदीला चांगलाच पाठिबा मिळण्याची शक्यताही वर्तविली गेली आहे.

सध्या सोन्याचे दर २७ हजारांच्या पातळीवर आहेत. हे दर आणखी उतरले की सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणे बँकाही सोने खरेदी करणार हे निश्चितच आहे. मात्र भारताची सोन्याची गरज प्रामुख्याने आयातीवरच भागविली जाते आणि सध्या डॉलरच्या तुलनेते रूपयाचे अवमूल्यन होत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणखी खाली आले तरी भारतात ते २५ हजारापेक्षा कमी होऊ शकणार नाही कारण रूपया उतरल्याने आयातीसाठी मोजावा लागणारा पैसा अधिक असेल असेही या अहवालात म्हटले गेले आहे.

सोन्याला कायम ग्राहक राहण्यामागे मध्यमवर्गीय तसेच उच्च मध्यमवर्गीयांना गुंतवणुकीचे दुसरे चांगले पर्याय नाहीत असेही जाणकारांचे मत आहे. मालमत्तेचे दर मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर आहेत आणि शेअर बाजारही नरम असल्याने हा वर्ग सोने खरेदीलाच अधिक प्राधान्य देत असतो. मात्र महागाई प्रचंड वाढल्याने हा वर्गही सोन्यातील गुंतवणूक प्रमाणातच करू शकणार असल्याचेही जाणकारांचे मत आहे.

२०१३ मध्ये भारत साधारणपणे ९०० टन सोने आयात करेल असाही अंदाज अहवालात वर्तविला गेला आहे.