पुणे दि.१ – प्रसूतीपूर्व लिंगनिदान चिकित्सा करून स्त्री भ्रूण हत्येचे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले असताना त्याला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ज्या उपाययोजना केल्या त्याला चांगले फळ येताना दिसून आले आहे. या वर्षात पुणे शहर तसेच पुणे जिल्ह्यातही मुलींच्या जन्मदरात चांगली वाढ झाल्याचे आढळले आहे. एक वर्षात हा जम्मदर तीस पॉईंटने वाढला असल्याचे समजते.
२०११ सालात लिंगनिदान चिकित्सा करून मुलींचा गर्भ असल्यास पाडून टाकण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते. त्यावर उपाय योजना म्हणून शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक सोनोग्राफी सेंटर्स आणि डॉक्टरांच्या क्लिनिकसवर छापे घालून असे प्रकार आढलेली यंत्रे सील करण्यात आली होती. त्याचबरोबर त्यात दोषी आढळलेल्यांवर खटलेही दाखल करण्यात आले होते. राज्यात २०११ ते २०१३ या काळात असे २९३ खटले दाखल करण्यात आले त्यात पुण्यातील ४७ केसेस होत्या असे राज्याचे नोडल अधिकारी डॉ. सुधाकर कोकणे यांनी सांगितले.
सध्या मुले आणि मुली यांच्या जन्मदराचे प्रमाण हजारी ९४८ पर्यंत आले आहे ही समाधानकारक बाब आहे असे सांगून डॉ.कोकणे म्हणाले की आरोग्य मंत्र्यांनी जूनपासून पुन्हा सोनोग्राफी सेंटर्स तपासणीचे आदेश दिले असून त्यात ८३३१ सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वेही आरोग्य विभागाने जारी केली आहेत. केवळ पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या अन्य जिल्ह्यातही मुलींचा जन्मदर वाढल्याचे ते म्हणाले.