ओक्लहामाला पुन्हा वादळाचा दणका

ओक्लहामा दि. १- अमेरिकेतील ओक्लहामा शहराला शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा वादळाने दणका दिला असून त्यात पाच जण मृत्यूमुखी पडल्याचे समजते. जखमींची संख्याही मोठी असून त्याचा निश्चित आकडा अद्याप समजू शकलेला नाही. पंधरा दिवसांतच ओक्लहामा शहराला वादळाचा दुसरा तडाखा बसला आहे. २० मे रोजी झालेल्या वादळात २४ जणांना प्राण गमवावे लागले होते.

शुक्रवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी महामार्गावर वाहनांची गर्दी असतानाच वादळाने पुन्हा एकदा शहराला दणका दिला. त्यात अनेक वाहने एकमेकांवर आपटली आणि त्यातच मायलेकीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून समजते. या वादळाची क्षमता मागच्या वादळापेक्षा नक्कीच कमी होती पण तरीही कांही भागात घरे पडली, झाडे पडली. जोरदार पावसामुळे समोरचे दिसणेही अशक्य बनले व त्यामुळे सुटका पथकांना मदत कार्यात अडचणी आल्याचे समजते. ठिक ठिकाणी पाणी साठल्याने मदत कार्याचा वेग मंदावला होता.

विमानतळावरच्या सर्व प्रवाशांना भुयारी मार्गात सुरक्षित स्थळी नेण्यात आले आणि विमानांची उड्डाणे रद्द केली गेली. या भागात येणारी अनेक विमाने दुसरीकडे वळविण्यात आली असेही समजते. हा सारा भाग वादळप्रणव क्षेत्र असून दरवर्षी येथे सरासरी १२०० वादळे होतात असे हवामानखात्यातर्फे सांगण्यात आले.

Leave a Comment