आपला चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत त्यासंबंधीचे एकही गुपित उघड होणार नाही यासाठी कमालीची काळजी घेणार्या बॉलीवूडमधील मोजक्या दिग्दर्शकांमध्ये संजय लीला भन्साळीची गणती होते. अर्थात ही गुपिते कशा ना कशाप्रकारे चव्हाट्यावर येतातच हा भाग वेगळा, पण भन्साळी हार मानण्यास अजिबात तयार नसतो. चित्रपटाविषयी लोकांना आधीच कळणार नाही याची तो
आपल्यापरीने दक्षता घेत असतो.
सध्या तो प्रियंका चोप्राला घेऊन भारताची ऑलिम्पिक पदक विजेती मुष्टियोद्धा मेरी कोमच्या जीवनावर चित्रपट काढत असून यावेळी तो बरीच खबरदारी घेत आहे. या चित्रपटाच्या युनिटला त्यातील गुपित उघड होणार नाही, अशी स्पष्ट ताकीदच देऊन टाकली आहे. सेटवर उपस्थित राहणार्या सगळ्य़ा लोकांचे मोबाईल फोन बंद करण्याचे फर्मान त्याने सोडले आहेत, पण चित्रीकरणस्थळावरची सुरक्षाव्यवस्थाही एकदम कडेकोट केली आहे.
एवढेच नाही तर भन्साळीने युनिटमधील प्रत्येक व्यक्तीकडून एक करारनामासुद्धा तयार करून घेतला आहे. त्याने घेतलेल्या या खबरदारीमुळे चित्रपटाशी संबंधित कोणतीही व्यक्ती चित्रपटाची कोणत्याही प्रकारची गुप्त माहिती उघड करू शकणार नाही. अगदी प्रियंकाला आपल्या भूमिकेबाबत
प्रसारमाध्यमांशी बोलण्यास त्याने मज्जाव केला आहे. काही दिवसांपूर्वी मेरी कोमसारखे दिसण्यासाठी प्रियंका एका प्रशिक्षकाची मदत घेत असल्याची खबर समोर आली होती.
ही खबर वाचल्यानंतर भन्साळी चांगलाच नाराज झाला होता. त्यामुळेच आता त्याने युनिटमधील लोकांकडून करारनामा लिहून घेण्यासोबतच सिक्युरिटीसुद्धा वाढविली आहे. मेरी कोमची जीवनगाथा रूपेरी पडद्यावर दाखविली जाणार्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ओमांग कुमार याच्यावर सोपविण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा व अन्य गोष्टींबाबत कुठेच वाच्यता होऊ नये यासाठी भन्साळी जरा जास्तच काळजी घेत असला तरी त्यात तो कितपत यशस्वी होतो, ही शंकाच आहे.