इस्लामाबाद दि.३१ – अमेरिकी ड्रोनच्या हल्ल्यात ठार झालेल्या पाकिस्तानच्या तेहरीक इ तालिबान संघटनेचा दोन नंबरचा नेता वली उल रहमान मेहसूद याच्या हत्येचा बदला घेण्यात येणार असल्याचे या संघटनेचा प्रवक्ता इशातुल्ला एहसान याने जाहीर केले आहे. रहमान याच्या बलीदानाचा आम्हाला अभिमान आहे असे सांगत या हत्येसाठी पाकिस्तान सरकारच जबाबदार असून तेच आमच्यासंबंधीची माहिती अमेरिकेला देत आहेत असाही आरोप त्याने या वेळी केला आहे.
पाकिस्तानात नव्यानेच निवडून आलेल्या शरीफ सरकारने देशात शांतता नांदण्यासाठी तालिबानी संघटनेला शांतता चर्चचे आवाहन दिले होते मात्र तेवढ्यातच रहमान ठार झाल्याने सरकारचे कोणतेही शांतता बोलण्यासंबंधीचे आमंत्रण स्वीकारले जाणार नाही असेही या संघटनेने जाहीर केले आहे. दरम्यान उत्तर वझिरीस्तानात झालेल्या या ड्रोन हल्ल्यात रहमानसह अन्य सातजण मृत्युमुखी पडले असून रेहमानचे अज्ञातस्थळी दफन करण्यात आले असल्याचेही समजते.
वली उल रहमान अमेरिकेला २००९ साली अफगाणिस्तानात हल्ला करून ठार केल्या गेलेल्या सीआयएच्या अधिकार्यां०साठी जबाबदार असल्याने अमेरिकेला तो हवा होता. अफगाणिस्तान सीमा भागात यूएस आणि नोटोच्या सैन्यावर आत्मघातकी हल्ले करण्यातही त्याचा हात होता असे समजते.
तेहरीक इ तालिबानने रहमानच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी खास सईद उर्फ सजना याची कमांडर म्हणून नेमणूक केली असल्याचेही जाहीर केले आहे.