१४५ चोर्‍या करणार्‍या शर्विलकाला न्यायालयाचा दिलासा

पुणे दि.३० – दयानंद शेट्टी या शर्विलकाची ही हकीकत ऐकून तुम्हाला खरेच नवल वाटेल. या बहाद्दराने फक्त पुणे जिल्हा परिसरात १४५ ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. त्यासंबंधी पुण्यात विविध ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या न्यायालयांत त्याला ९६ चोर्‍याप्रकरणी दोषी ठरविले गेले आणि त्यासाठी विविध न्यायालयांनी त्याला शिक्षाही सुनावल्या. त्यानुसार तुरूंगवासाच्या या शिक्षा त्याने वेगवेगळ्या भोगायच्या होत्या आणि अशा पद्धतीने त्याचा तुरुंगवास एकूण ३०३ वर्षांवर गेला होता.

पण नवलाची गोष्ट अशी की त्याच्या वकीलांनी सत्र न्यायालयात या शिक्षांविरोधात अपील करून या सर्व शिक्षा त्याला एकत्रच भोगू द्याव्यात अशी विनंती केली आणि सत्र न्यायाधीशांनी ती मान्यही केली. त्यानुसार दयानंद आता केवळ सात वर्षे तुरूंगवास भोगणार आहे. म्हणजे ३०३ वर्षांवरून त्याची शिक्षा एकदम सात वर्षांवर आली आहे.

मोहननगर चिंचवड परिसरातील रहिवासी असलेल्या दयानंदला पुणे पोलिसांनी १४ जानेवारी २००७ रोजी अटक केली आणि त्याची चौकशी केली तेव्हा त्याने १४५ चोर्‍या केल्या असल्याचे उघडकीस आले होते. मात्र त्याला न्यायालयांनी भक्कम पुराव्याअभावी ४९ चोर्‍याप्रकरणी निर्दोष सोडले होते व ९६ प्रकरणात तो दोषी ठरला होता.

शिक्षेत सूट मिळताच दयानंदने सत्र न्यायाधीश बी.ए.अलूर यांच्याकडे त्याला झालेला ४१ हजार रूपयांचा दंडही माफ करावा अशी विनंती केली. मात्र न्यायाधीशांनी ती फेटाळून लावली असेही समजते.

Leave a Comment