जागा वाटपाचा तिढा सोडवा , मग मला बोलवा – राज ठाकरे

मुंबई, दि.३० -. ‘आधी तुमच्या तिघांमधील, जागा वाटपाचा तिढा सोडवा मग मला आमंत्रण द्या,’ असे मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना सुनावले आहे. रामदास आठवले यांनी एका जाहीर सभेत बोलताना मनसेला महायुतीत येण्याचे आवाहन केले होते. बिनधोकपणे काँग्रेस -राष्ट्रवादीचा पराभव करायचा असेल तर मनसेला सोबत घेण्याची गरज असल्याचे आठवले यांनी म्हटले होते.

आठवले यांचे हे आवाहन शिवसेनेने ’दैनिक सामना’तील अग्रलेखाच्या माध्यमातून धुडकावून लावले होते. तसेच टाळीसाठी वारंवार राज ठाकरे यांच्यापुढे हात करणारया भाजपलाही झोडपले होते. मंगळवारी दिवसभर या ’तू-तू, मै-मै’ची चर्चा मीडियात रंगली होती.

हा कलगीतुरा दुरूनच पाहणारया राज ठाकरे यांनी एका दैनिकाशी बोलताना रिपाइंला टोला लगावला आहे. आधी जागावाटपाचे भांडण मिटवा, मग मला बोलवा, असा सल्ला राज यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे. मात्र, राज यांच्या या वक्तव्यामुळे अधिक संदिग्धता निर्माण झाली आहे. जागावाटप मनाप्रमाणे झाल्यास महायुतीत जाण्याची राज यांची इच्छा आहे की काय, असा प्रश्नल यानिमित्ताने निर्माण झाला आहे.