भारत आणि थायलंडमध्ये बहुप्रतीक्षित प्रत्यार्पण करार

बँकॉक, दि.30 -भारत आणि थायलंडने आज बहुप्रतीक्षित प्रत्यार्पण करारावर स्वाक्षरी केली. द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याच्या दृष्टीने हा करार अत्यंत महत्वपूर्ण मानण्यात येत आहे.

जपान दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान मनमोहनसिंग आज थायलंडमध्ये दाखल झाले. येथे त्यांनी थायलंडच्या पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा यांच्याशी विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सात करार झाले. त्यात प्रत्यार्पण कराराचाही समावेश आहे. तब्बल 20 वर्षांच्या वाटाघाटीनंतर या करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षर्‍या केल्या. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा साथीदार मुन्ना झिंगाडा सध्या थायलंडमधील तुरूंगात आहे. आजच्या करारामुळे तो भारताच्या ताब्यात मिळण्याची शक्यता बळावली आहे. अनेक गुन्ह्यांबद्दल तो मुंबई पोलिसांना हवा आहे. छोटा राजनवर हल्ला केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवण्याच्या प्रकारांना आणि पैशांच्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठीही दोन्ही देशांनी करार केला. अवकाश तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्यासाठीही दोन्ही बाजूंमध्ये महत्वपूर्ण करार झाले. यावेळी दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावरही सहमती झाली.

Leave a Comment