नवी दिल्ली, दि.30 -देशाची राजधानी दिल्लीसह शहरी भागांमध्ये हिंसाचार घडवण्याचा माओवादी नक्षलवाद्यांचा डाव असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. अशातच पुणे शहरही नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे खुद्द केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सूचित केले आहे.
शहरी भागांमध्ये हिंसाचार घडवण्याचा कट नक्षलवाद्यांनी रचला आहे. या हिंसाचारावेळी नक्षलवाद्यांकडून लक्ष्य निर्धारित करून हत्या (टार्गेटेड किलिंग) घडवल्या जाऊ शकतात, असा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिल्याचे कालच समोर आले. यासंदर्भात आज पत्रकारांनी शिंदे यांना प्रश्न विचारले. त्यावर ते उत्तरले, याबाबतची माहिती आमच्याकडे आधीपासूनच आहे. पुण्याबाबत आमच्याकडे माहिती आहे. इतरत्रही तसे घडू शकते. शहरी भागांतही आपले जाळे पसरवण्याचा नक्षलवाद्यांचा डाव आहे.
छत्तिसगढमध्ये नक्षलवाद्यांनी 25 मे यादिवशी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेला लक्ष्य केले. त्या हल्ल्यात काँग्रेसच्या काही नेत्यांसह 27 जण मृत्युमुखी पडले. यापार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या यात्रेला पुरेशी सुरक्षा पुरवण्यात छत्तिसगढ सरकारला अपयश आले का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीचा आदेश दिला आहे. त्यातून सत्य बाहेर येईल. दरम्यान, शिंदे यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. छत्तिसगढमधील नक्षलवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून कुठली पाऊले उचलण्यात येत आहेत याबाबतची माहिती त्यांनी या भेटीत दिल्याचे समजते. नक्षलवादी हल्ल्यानंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी शिंदे उद्या छत्तिसगढला जाणार आहेत.