ओसामाने केली होती आत्महत्त्या

अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन हा अमेरिकी सील कमांडोंच्या हातून मारला गेला नव्हता तर त्याने कमरेच्या सुसाईड बेल्टचा वापर करून आत्महत्त्या केली होती असा दावा ओसामाचा बॉडी गार्ड नबील नसीम अब्दुल फत्ते याने केला आहे. गल्फ न्यूजला मुलाखत देताना तो बोलत होता. नसीम म्हणाला की आपण अमेरिकेच्या हाती लागू नये, पकडले जाऊ नये आणि आपली गुपिते आपल्या मरणापर्यंत तरी गुप्तच राहावीत असा ओसामाचा प्रयत्न होता. अमेरिकन सील कमांडोंनी गोळ्या घालून ओसामाला ठार केल्याचा जो दावा केला आहे तेा खोटा आहे. तसेच त्याच्या शरीराचे सम्रुदात दफन केल्याचे सांगितले जात आहे तेही खोटे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा खोटे बोलत आहेत.

अमेरिकेच्या कमांडोंनी जेव्हा ओसामा राहात असलेल्या अबोटाबादेतील इमारतीचे कपौंड तोडले आणि दोन रक्षकांना ठार केले तेव्हाच ओसामाने आपल्या कमरेला बांधलेल्या सुसाईड बेल्टचा स्फोट केला होता आणि त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या होत्या. या कारवाईच्या वेळी मी तेथे नव्हतो मात्र ओसामाच्या जवळच्या नातेवाईकाने मला ही माहिती दिली असेही नसीम म्हणाला. ओसामाने कमरेच्या बेल्टचा स्फोट केल्याने त्याच्या शरीराचे तुकडे झाले व त्यामुळे त्याला ओळखण्याची कोणतीच खूण शिल्लक राहिली नव्हती असाही दावा त्याने केला आहे. गेली दहा वर्षे ओसामा हा सुसाईड बेल्ट रात्रंदिवस आपल्या कमरेला बांधत होता असेही त्याने सांगितले. अमेरिकेच्या ताब्यात सापडायचे नाही असा ओसामाचा निर्धार होता असेही नसीम म्हणाला.

Leave a Comment