सुशीलकुमार शिंदे यांच्यावर काँग्रेसचीही टीका

नवी दिल्ली दि.२९ – छत्तीसगढ राज्यात काँग्रेस यात्रेवर माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काँग्रेसचे वरीष्ठ नेते मरण पावले असताना गृहमंत्री सुशीलकुमार शिदे हे वैयक्तीक कारणांसाठी अमेरिकेत राहिले आहेत यावरून आज त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते भक्त चरणदास या विषयी बोलताना म्हणाले की देशाला हादरवून टाकणारी घटना घडली असताना देशाच्या गृहमंत्र्यांसाठी परदेशातला कुठलाच दौरा महत्त्वाचा असू शकत नाही. मात्र शिंदे यांनी अधिकृत दौरा संपल्यानंतरही वैयकितक भेटींसाठी अमेरिकेत मुककाम वाढविला आहे.

अर्थात शिंदे यांच्या या वागण्याचे राजकीय भांडवल केले जाऊ नये असे स्पष्ट करून चरणदास म्हणाले की नक्षली हल्लयानंतर स्वतः पंतप्रधानांनी या भागाचा दौरा करून संबंधितांची भेट घेतली आहे. शिंदे यांनी अमेरिकेतूनच छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्याशी बोलणे करून हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविला जात असल्याचे फोनवरून सांगितले होते.

सुशीलकुमार शिंदे यांचा अमेरिका दौरा वास्तविक २२ मे लाच संपला आहे. त्यांच्याबरोबर गेलेले अन्य पदाधिकारी आणि नेते १९ तारखेलाच परतले आहेत. मात्र नक्षली हल्लयाची घटना होऊनही शिंदे यांनी मात्र परत न येता त्यांच्या पत्नीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मेरिलँडला जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यावरूनच त्यांच्यावर विरोधी पक्षांनीही टीका केली आहेच पण आता त्यांच्याच पक्षातील नेत्यांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment