प्रशांत दीक्षित व अजय कांबळे यांना नारद पत्रकारिता पुरस्कार

पुणे,दि.29: वेदवाङमयातून येणार्‍या नारदऋर्षीचा उल्लेख हा पत्रकारांप्रमाणे विश्वसंवादी म्हणून येतो. म्हणून त्यांच्या नावाने गेली काही वर्षे अनेक राज्यात आदर्श पत्रकारितेसाठी देवर्षी नारद पुरस्कार सुुरु झाले आहेत. विश्वसंवाद केंद्र, पुणे व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीनेही पुण्यात असे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यातील ज्येष्ठ पत्रकारितेचा पुरस्कार श्री प्रशांत दीक्षित यांना व युवा पत्रकारितेचा पुरस्कार इंडिया टीव्हीचे पुणे विभागाचे ब्युरो चीफ अजय कांबळे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचा वितरण समारंभ दि.2 जूनरोजी सायंकाळी सहा वाजता पुण्यात सिंबायोसिसच्या विश्वभवनमध्ये होणार आहे. त्या समारंभाचे अध्यक्षस्थान व्यासंगी व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर हे स्वीकारणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून गप्पाष्टककार डॉ संजय उपाध्ये उपस्थित राहणार आहेत.

पत्रकारांशी बोलताना पुणे विश्वसंवाद केंद्राचे मनोहर कुलकर्णी म्हणाले, ज्येष्ठपत्रकार प्रशंात दीक्षीत हे गेली 24 वर्षे पत्रकारितेत आहेत. त्यांनी दैनिक सकाळ, दैनिक महाराष्ट्र टाईम्स व दैनिक लोकसत्ता यात महत्वाच्या जागेवर काम केले आहे. त्यांची दिल्लीची वार्तापत्रे व कारगीलयुद्धावरील कारगीलनामा हे विषय अनेक घटनांना चालना देणारे व भारत पाक समस्येवर भाष्य करणारे ठरले आहे. तरुणांच्या भावना जाणून त्यांनी युवा सदरात केलेले लेखन दीर्घकालानंतर आजही वाचकांच्या स्मरणात आहे. त्याना दिला जाणारा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार हा अकरा हजार रुपये व मानचिन्ह असा आहे.

श्री अजय कांबळे हे गेली बारा वर्षे पत्रकारितेत आहेत. त्यांनी दिनमान स्थानिक वृत्तवाहिनीतून कामाला प्रारंभ केला व गेली नउ वर्षे ते इंडियाटीव्हीचे ब्युरोचीफ म्हणून काम करत आहेत.पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट व जंगली महाराज रोडवरील बॉम्बस्फोट मालिका याबाबत त्यांनी केलेले वृत्तसंकलन हे अधिक माहितीपूर्ण ठरले आहे. त्याचप्रमाणें महाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, सहकार चळवळ, तसेचे राजकीय व सामाजिक मुद्द्यावर त्यांनी त्यांच्या माध्यमातून प्रभावी मांडणी केली आहे. पुण्याच्या बुधवार पेठेत एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा विषय त्यानी स्टिंग ऑपरेशन करून मांडला होता. त्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली होती. युवा पत्रकारिता पुरस्कार हा पाच हजार रुपये व नानचिन्ह असा आहे.

हे पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षीचा पुरस्कार स्टार माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना दिला होता. दुसर्‍या वर्षीपासून दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यातील ज्येष्ठ पत्रकारितेचा पुरस्कार बेळगाव तरुण भारतचे संपादक श्री किरण ठाकूर यांना दिला होता व युवा पत्रकारिता पुरस्कार नासिकच्या आयबीएन लोकमतेच्या दीप्ती राउत यंाना दिला होता.

Leave a Comment