चंडिला, श्रीशांतसह नऊ जणांना ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली, दि.२९ – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाच्या एस. श्रीशांत आणि अजित चंडेलियासह नऊ जणांना मंगळवारी दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

एस. श्रीशांत आणि चंडेलियासह सट्टेबाज चंद्रेश पटेल आणि अश्विनी उर्फ टीपू यांची पोलीस कोठडी मंगळवारी संपत होती. त्यामुळे त्यांना मंगळवारी दिल्लीच्या स्थानिक कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी श्रीशांतची पोलीस कोठडी आणखी वाढवून मागितली, मात्र न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी वाढवून देण्यास नकार दिला व ४ जूनपर्यंत या चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान याच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अंकित चव्हाणने, त्याचे २ जूनला लग्न असल्याचे सांगत जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून त्यालाही ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.याच प्रकरणात अटक करण्यात आलेला क्रिकेटपटू बाबू राव यालाही ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

न्यायालयाने या सहा आरोपींव्यतिरिक्त आणखी तीन सट्टेबाज- जीजू जनार्दन, दीपक कुमार आणि मनन भट्ट यांनाही ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. दरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी एकूण १९ जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Comment