लिपस्टीकचे डाग आणि ओबामा

वॉशिग्टन दि.२९ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे बलाढ्य अशा राष्ट्राचे नेतृत्त्व करत असले तरी तेही जगातील सर्व पुरूषांप्रमाणेच पत्नीला घाबरतात आणि तिच्याशी वादाचा प्रसंग येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतात असे सांगितले तर कदाचित कुणाला पटणार नाही. मात्र या प्रसंगातील ओबामा यांची विधानेच हे सिद्ध करण्यास पुरेशी आहेत.

घडले असे की ओबामा यांनी त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच व्हाईट हाऊसमध्ये आशियन अमेरिकन पॅसिफिक वासियांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते आणि या कार्यक्रमाला अनेक इंडियन अमेरिकन नागरिकही उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आलेल्या तीनशेहून अधिक जणांचे स्वागत त्यांनी केले पण त्याचवेळी आलिंगन देताना त्यांच्या शर्टवर लिपस्टीकचे डाग पडल्याचे दिसून आले. ओबामांची विनोदबुद्धी ताबडतोब जागी झाली आणि त्यांनी त्वरीत तुमच्या प्रेमाचे हे प्रतीक पहा म्हणून हे डाग उपस्थितांना दाखविले.

इतके करूनच ते थांबले नाहीत तर यासाठी अमेरिकन आयडॉलच्या ११ व्या सीझनची उपविजेती जेसिका सँचेझ ही जबाबदार असल्याचे सांगून ते म्हणाले की जेसिकाने या कार्यक्रमाला तिच्या आत्याला बरोबर आणले आहे आणि या आत्याबाईंच्या प्रेमामुळे माझ्या कॉलरवर हे डाग पडले आहेत. आत्याबाईंना ओबामा यांनी बोलावून त्यांच्या लिपस्टीकचा आणि शर्टच्या कॉलरवरील डागांचा रंग सारखाच असल्याचे दाखवित सर्वांनी हे समक्ष पहा असेही सांगितले. सर्वांनी हे दाखविण्यामागे फर्स्ट लेडी मिशेल बरोबर मला वाद व्हायला नकोय अशी पुस्तीही त्यांनी जोडली. सर्व उपस्थितांनी अध्यक्षांच्या या वाक्याला भरभरून दाद दिली हे सांगायला नकोच.

Leave a Comment