पदार्पणातच ‘रॉकस्टार’सारखा चित्रपट देऊनही बॉलीवूडने फारशी दखल न घेतलेली अभिनेत्री नर्गिस फाखरीचे नशीब अचानक फळफळले आहे. रिमेक आणि
सिक्वल चित्रपटांमध्ये तिला सतत संधी मिळू लागली आहे. गेल्या दिवसांपासून घरीच बसून असलेल्या नर्गिसची ‘वेलकम’च्या सिक्वलमध्ये वर्णी लागल्यानंतर
आता एेंशीच्या दशकातील बासू चॅटर्जीचा चित्रपट ‘शौकीन’च्या रिमेकमध्येही तिला काम मिळाले आहे. या चित्रपटासाठी निवड होण्यासोबतच तिच्यासाठी
दुहेरी आनंदाची गोष्ट म्हणजे यामध्ये ती सध्या सुपरहिट चित्रपटांचे मशीन बनलेल्या अक्षय कुमारची नायिका रंगविणार आहे. खुद्द अक्षयनेच आपले वजन
वारून तिच्या या चित्रपटासाठी शिफारस केल्याचे समजते. खरेतर ‘खिलाडी ७८६’मध्येच तिची अक्षयची नायिका म्हणून निवड करण्यात आली होती, पण त्यात ती मिथुन चक्रवर्तीची बहीण म्हणून शोभत नसल्याने तिला डावलण्यात आले होते.
‘खिलाडी ७८६’ अक्षयकुमारचीच निर्मिती असून हा निर्णय घेताना त्याला अतिशय वाईट वाटले होते. बहुधा ‘शौकीन’मध्ये नर्गिसला संधी देऊन त्याने आपली चूक
सुधारली आहे. ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘गली गली चोर है’ आणि ‘लाईफ पार्टनर’सारखे चित्रपट देणारा रुमी जाफरी ‘शौकीन’चा रिमेक बनवत आहे. बासू
चॅटर्जीच्या या सुपरहिट चित्रपटात तीन वृद्धांची कहाणी असून ते एका तरुणीवर प्रेम करू लागतात. वृद्धांच्या या भूमिका अशोक कुमार, उत्पल दत्त आणि ए. के. हंगल यांनी साकारल्या होत्या. त्यात नायकाच्या भूमिकेत मिथुन होता. मिथुनची भूमिका आता अक्षय करणार आहे तर वृद्धांच्या पात्रांसाठी ऋषी कपूर, परेश रावल आणि अनू कपूर यांची निवड करण्यात आली आहे. ‘रॉकस्टार’नंतर एकतरी चित्रपट मिळावा याकडे डोळे लावून बसलेल्या नर्गिससाठी हा चित्रपट मैलाचा दगड ठरू शकतो. ती स्वत:ही चांगल्या प्रकारे हे जाणून आहे. जुन्या ‘शौकीन’मधील रती अग्निहोत्रीची भूमिका ती साकारणार आहे. रतीच्या तोडीची अदाकारी पडद्यावर दाखविण्यासाठी तिने हल्लीच हा चित्रपट पाहिला. सध्या ती आपल्या हिंदी उच्चारांवर मेहनत घेत आहे. ‘चष्मेबद्दूर’ला ज्या प्रकारचे यश मिळाले, तसेच ‘शौकीन’च्या बाबतीतही घडेल, अशी तिला आशा आहे. ऑगस्टपासून या चित्रपटाचे चित्रण सुरू होईल.