मनसेशी युतीची शक्यता उद्धव ठाकरे यांनी फेटाळली

मुंबई दि.२८ – ठाकरे बंधूंमध्ये सलोखा घडवून आणणारच या महायुतीच्या सहयोगी पक्षांच्या विधानाला शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिले असून राज ठाकरे यांच्या मनसेबरोबर मनोमिलनाची शक्यता फेटाळून लावली आहे. सेनेचे मुखपत्र सामना मध्ये लिहिताना उद्धव यांनी शिवसेना भाजप आणि रिपब्लिकन युतीचे चांगले चालले आहे त्यात चौथा भागीदार नको असे विधान केले आहे.

ते पुढे म्हणतात की भाजपचे नितीन गडकरी यांनी पुण्यात गेल्याच आठवड्यात राज आणि उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी ते स्वतः आणि भाजप आटोकाट प्रयत्न करतील असे सांगितले आहे. पण गडकरी यांनी आधी स्वतःच्या पक्षातील नेत्यांमध्ये युती घडवून आणावी. गडकरी मुंडे आणि विनोद तावडे तसेच पंतप्रधानपदाचे दावेदार लालकृष्ण आडवानी आणि नरेंद्र मोदी यांच्यात युती घडवून आणावी असा टोला लावताना रिपब्लीकन पक्षाचे रामदास आठवले यांनाही फटकारले आहे.

रामदास आठवले यांनी तर राज उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी राज ठाकरे यांच्या घरी जाण्याचीही तयारी दर्शविली होती. या सार्याज प्रकारात मनसेने मात्र आपली शांतता कायम राखली असून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Comment