पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज झाल्यानेच भारताने युद्धाचा धोका टाळला

इस्लामाबाद दि.२८ – पाकिस्तानबरोबर गेल्या कांही वर्षात तीन वेळा युद्ध करण्याचा प्रसंग येऊनही भारताने हा धोका टाळला यामागे पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज झाला होता हेच कारण होते असे पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ समर मुबारकमंद यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

मुबारकमंद याविषयी बोलताना म्हणाले की भारताने पाच अणुचाचण्या केल्या त्यानंतर लगेचच १४ मे १९९९ च्या पाक संरक्षण समितीच्या बैठकीत पाकिस्तानने अणुचाचण्या करण्याचा निर्णय घेतला. त्याला तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हिरवा कंदिल दाखविला आणि बलुचिस्तानातील शाघाई येथे २८ मेलाच पाकिस्तानने पाच अणुचाचण्या केल्या व ३० मे रोजी सहावी चाचणी करून भारतावर कुरघोडी केली.

याचा परिणाम असा झाला की नवी दिल्लीला पाकिस्तानवर आक्रमण केले तर त्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता पाकिस्तानकडे आहे याची जाणीव झाली. परिणामी १९९९ कारगील, २२०२ पाकिस्तानी सीमेवर भारतीय लष्कराची आगेकूच आणि २००८ चा मुंबई हल्ला यानंतर दोन्ही देशात तणावपूर्ण संबंध असतानाही दोन्ही देशांनी युद्धाचे हे प्रसंग टाळले आणि यामागे पाक अण्वस्त्रसज्ज होता हेच मुख्य कारण होते असे समर मुबारकमंद म्हणाले.