नील आर्मस्ट्राग यांनी आणलेले चांद्रमातीचे नमुने गोदामात सापडले

लॉरेल्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरीच्या गोदामात साफसफाई करत असताना करेन नेल्सन हिला जणू खजिनाच मिळाला. काय होता हा खजिना? हा खजिना म्हणजे सुमारे ४० वर्षांपूर्वी नासाच्या अपोलो ११ मधून चंद्रावर पाऊल ठेवणारे अंतराळवीर नील आर्मस्टाँग आणि त्यांचे सहकारी अल्डीन यांनी गोळा केलेले आणि वीस बाटल्यात भरले गेलेले चंद्रावरील खडक आणि मातीचे नमुने. १९६९ साली गोळा केलेले हे नमुने या गोदामात धूळ खात पडून होते.

अपोलो यानातील अंतराळवीरांनी गोळा करून आणलेले चंद्रावरील माती व खडकांचे नमुने त्याकाळी सुमारे १५० प्रयोगशाळांत तपासणीसाठी पाठविले गेले होते तसेच ते या प्रयोगशाळेतही आले होते. त्यांचे संशोधन केल्यानंतर आणि त्यावरील पेपर प्रकाशित केल्यानंतर हे नमुने नासाला परत करणे आवश्यक होते मात्र या प्रयेागशाळेत ते गोदामात तसेच पडून राहिल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

कदाचित या नमुन्याच्या तपासणीत चंद्रावर यापूर्वी कधीही जीवन नव्हते हे सिद्ध झाल्याने संशोधकांचा उत्साह संपला असावा किवा त्यांची दुसर्यां दा परिक्षणे करायची म्हणूनही ते तसेच ठेवले गेले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. केरनने मात्र हे नमुने मिळताच त्वरीत नासाला त्याची खबर दिली असून हे नमुने पाठवून देण्यास नासाकडून सांगितले गेले आहे असेही समजते.

Leave a Comment