ज्ॉकलीनची लागली लॉटरी

बॉलीवूडमध्ये नशीब काढण्यासाठी आलेली श्रीलंकन सुंदरी ज्ॉकलीन फर्नांडिसची कारकीर्द धिम्या गतीने का होईना हळूहळू रुळावर येत आहे. आता
तर तिला लॉटरीच लागली आहे. आजवर दुसर्‍या फळीतील नायकांसोबत दिसणार्‍या ज्ॉकलीनला आता थेट दबंग खान सलमानची नायिका होण्याची संधी चालून आली आहे. आगामी किक नामक चित्रपटामध्ये ती सलमानच्या नायिकेच्या रूपात दिसेल.

विशेष म्हणजे अनेक मातब्बर नट्यांवर मात करून ज्ॉकलीनने ही भूमिका आपल्या पदरात पाडून घेतली आहे. साजिद नाडियादवाला दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटाची घोषणा खरेतर बर्‍याच दिवसांपूर्वी झाली आहे, पण सलमानला सवड नसल्याने त्याचा मुहूर्त सातत्याने लांबणीवर पडत गेला. आता तो काहीसा मोकळा झाल्याने लवकरच त्याच्या चित्रणास प्रारंभ होईल, अशी आशा आहे.

बॉलीवूडमधील सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटात वर्णी लावून घेण्यासाठी दीपिका पदुकोन गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नात होती. ही
भूमिका मिळविण्यासाठी तिने पूर्ण जोरही लावला होता. तिचे नाव जवळपास फायनलसुद्धा करण्यात आले होते, पण साजिदला तिच्या पाच महिन्यांच्या तारखा सलग हव्या होत्या. आपल्या बिझी शेड्युलमुळे दीपिकासाठी मात्र हे शक्यच नव्हते. सध्या ती अनेक चित्रपटात गर्क असल्याने एवढय़ा तारखा एका चित्रपटासाठी एकाच वेळी देणे तिच्यासाठी दुरापास्त होते. अखेर नाइलाजाने तिला माघार घ्यावी लागले. साजिदची निर्मिती असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये ज्ॉकलीनने काम केलेले आहे. तिचा अभिनय व सौंदर्याने त्याला चांगलेच प्रभावित केले आहे. म्हणूनच या चित्रपटासाठीही त्याने तिच्यासमोर प्रस्ताव ठेवला. सलमानची हिरोईन होण्याची एवढी मोठी संधी चालून आली आहे, म्हटल्यावर क्षणाचाही वेळ न दवडता तिने त्यास होकार कळविला. आपल्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये ज्ॉकलीनला चालून आलेली ही सर्वात मोठी संधी आहे, पण यामुळे सलमानसोबत काम करण्यासाठी देव पाण्यात टाकून बसलेल्या दीपिकाला त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.