पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) -अंग भरून कपड्यातील अभिनय आजही रसिकांना आवडतो. कमी कपड्यातील अभिनयाला अभिजातता नसते, असे राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी ‘उमेद’ पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना सांगितले.
ज्येष्ठ गायिका उषा उत्त्थुप, अभिनेते दिलीप प्रभावळकर, अशोक समर्थ, अभिजीत खांडकेकर, अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांना यावर्षीचा ‘वरद लक्ष्मी’ या चित्रपटसंस्थेचा उमेद पुरस्कार वितरण यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाले. यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जुनी गाणी व जुना अभिनय आजही रसिकांच्या हृदयात – तटकरे– उषा उत्थुप, दिपील प्रभावळकर यांना ‘उमेद पुरस्कार’
तटकरे म्हणाले, समाजाला सुधारण्याचे काम सरकार किंवा कायद्याबरोबर चित्रपटाचे उत्तम कथानकही करू शकते. गेल्या पिढीतील अभिजात अभिनेत्री वहिदा रेहमान आपल्या भाषणात म्हणाल्या, कलाकाराला कोणतीही जात नसते, धर्म नसतो. ‘वरद लक्ष्मी’ सारखी मंडळी दुसर्यांसाठी काम करतात याचे कौतुक वाटते. ज्येष्ठ गायिका उषा उत्त्थुप म्हणाल्या, पुण्यात माझा सत्कार होतोय ही अभिमानाची बाब आहे. कारण माझी आई पुण्याची आणि वडील मुंबईचे. हा सन्मान म्हणजे घरच्या लोकांनी माझ्या कामाचं केलेलं कोतुक आहे.
पुरस्कारप्राप्त कलाकारांना कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे प्रश्न निवेदिका स्मिता गवाणकर यांनी विचारले. यात जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना धनसंपदा आणि जलसंपदा यात साम्य काय, असे विचारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. प्रश्नाला उत्तर देताना तटकरे म्हणाले, जलाशिवाय धन कमावू शकत नाही. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे, त्यामुळे जनतेला पाण्याचे मोल माहित आहे.
राज कपुर, गुरुदत्त, देवआनंद या तिघांपैकी कोणाबरोबर काम करणं पसंद करत होता, यावर उत्तर देताना वहिदाजी म्हणाल्या, देवआनंद, कारण माझा पहिला चित्रपट सीआयडी हा त्यांच्याबरोबरचा. देवसाहेबांच्या अभिनयाचा माझ्या अभिनयावर मोठा परिणाम झाला आहे. उषा उत्त्थुप यांनी यावेळी आपला या क्षेत्रातला आजवरचा प्रवास सांगितला. तर अशोक समर्थ यांनी ‘सिंघम’ चित्रपटातील संवाद म्हणत प्रेक्षकांची मने जिंकली. ‘लक्ष्मी चित्र’चे महेश टिळेकर, बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते. स्मिता गवाणकर यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट –
उषा उत्थुप आणि ‘दम मारो दम’…
‘गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम’ गाइड या चित्रपटातले दम मारो दम हे गाणं मला प्रथम मिळालं होतं,त्या गाण्याची तयारी पण झाली होती.अचानकच पंचमदानी ते गाण अशा भोसलेना दिलं..अणि मला त्याच चित्रटातलं ‘हरे रामा हरे कृष्णा’ हे गाणं दिलं. कार्यक्रमा दरम्यान उपस्थित प्रेक्षकांनी उषाजींना गाण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी ‘ढगाला लागली कळं..’हे मराठी गीत गाऊन उपस्थित रसिकांची मने जिंकली.
…………………..
