अखेर मुंबई इंडियन्सच सुपर किंग्ज

कोलकाता, दि.२७- चेन्नई सुपर किंग्जवर २३ धावांनी विजय मिळवत मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या सहाव्या मोसमाचे जेतेपद पटकावत आपणच सुपर किंग असल्याचे दाखवून दिले. मुंबईच्या १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणा-या चेन्नईला मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर १२५ धावाच करता आल्या. मुंबईने प्रथमच आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. यापूर्वी आयपीएलच्या तिस-या हंगामात चेन्नईने अंतिम फेरीत मुंबईला पराभूत केले होते. गेल्यावेळी चेन्नईला कोलकाताने विजयापासून रोखले होते. यावेळी मुंबईने ही कामगिरी केली.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह ढोणीचा अपवाद वगळता अन्य फलंदाज फक्त हजेरी लावून तंबूत परतले. चेन्नईकडून ढोणीने नाबाद ६३ धावा केल्या. ढोणीने अखेरपर्यंत मैदानावर राहून चेन्नईचा पराभव लांबवला.

मुंबईच्या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईचा निम्मा संघ ३५ धावात तंबुत परतला होता. मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर चेन्नईचा शेर ढेर होत गेले. पहिल्या दोन षटकातच चेन्नईचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. आयपीएलमध्ये खो-याने धावा काढणा-या माइक हसीच्या वयैक्तीक एका धावेवर मलिंगाने यष्टया वाकवल्या. त्यानंतर सुरेश रैनाला मलिंगाने शून्यावरच स्मिथकडे झेल द्यायला भाग पाडले.

बद्रीनाथचीही तीच गत केली. जॉन्सनने त्याला शून्यावरच यष्टीरक्षक कार्तिकरवी झेलबाद केले. त्यानंतर ब्राव्होने मुरली विजयच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण १५ धावांवर धवनने त्याला जॉन्सनकरवी झेलबाद केले. रविंद्र जाडेजाला हरभजनने भोपळाही फोडू दिला नाही. त्याला पोर्लाडकरवी झेलबाद केले.

किरॉन पोर्लाडच्या ३२ चेंडूतील तडाखेबंद ६० धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने चेन्नईला १४९ धावांचे आव्हान दिले. मुंबईच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशानजक झाली होती. पन्नाशीतच मुंबईचे चार प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते. किरॉन पोर्लाडने एकबाजू लावून धरल्याने मुंबईला दीडशेच्या जवळपास पोहचता आले. चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच जखडून ठेवले. डॅरेन ब्राव्हो चेन्नईचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. ब्राव्होने चार गडी बाद केले. रायडूही ब्राव्होची शिकार ठरला. स्मिथ, आदित्य तरे आणि रोहित शर्मा यांना संघाच्या वीस धावा होण्यापूर्वीच चेन्नईच्या गोलंदाजांनी माघारी धाडले होते.

पहिल्या चेंडूवर चौकार मारणा-या स्मिथला शर्माने चार धावांवर पायचीत पकडले.
त्यानंतर आदित्य तरेला मॉर्केलने भोपळाही फोडू दिला नाही. रोहित शर्मालाही मॉर्केलने अवघ्या दोन धावांवर आल्या पावली माघारी धाडले. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि अंबाती रायडू यांनी मुंबईच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण संघाच्या ५२ धावा झाल्या असताना, मॉरिसने कार्तिकच्या यष्टया वाकवल्या. कार्तिकने २१ धावा केल्या.

Leave a Comment