आपल्या ठसकेदार आवाजाने आणि वेगळया शैलीने बॉलीवूडमध्ये हिट गाणी देणाऱया गायक मिका सिंगने आपला पंजाबी जलवा आता मराठीतही दाखवला आहे. आगामी ‘पावडर’ या मराठी सिनेमात मिका एक रॉकिंग गाणं गायला आहे. ‘ओ माझी मैना.. सुन माझा कहना’ असं म्हणत मराठीतही आपलं गाणं व नाणं दमदार वाजणार असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे.
ढिंक चिका (रेडी), ताकी रे ताकी रे (हिंम्मतवाला), चिंताता चिता चिता (रावडी राठोड) या सारखी अनेक हिट गाणी देणारा मिका पथमच ‘क्षत्रिय पोडक्शन’च्या आगामी मराठी चित्रपटासाठी गायला. नुकतंच या गाण्याचं रेकॉर्डिंग अंधेरीतल्या स्टुडिओत पार पडलं. दादा कोंडकेंचा चाहता असणारा मिका आपल्या पहिल्या गाण्यासाठी खूपच उत्सुक होता. मराठी चित्रपटासाठी गाणं गायला मिळाल्याचा आनंद त्याने यापसंगी व्यक्त केला. गीतकार नियाज यांच्या ‘ओ माझी मैना.. सुन माझा कहना’ या मराठी – हिंदी मिश्रित गाण्याला युवा संगीतकार अभिजीत कवठाळकर यांनी संगीत दिलं आहे.
सहज सोप्या शब्दामुळे हे गाणं गायला फारसा त्रास झाला नाही, या गाण्यामुळे आपलं मराठी अधिक सुधारेल, अशी आशा मिकाने यावेळी बोलून दाखवली. या रेकॉर्डिंगच्या वेळी मिका सोबत संतोष जुवेकर, गिरीजा जोशी हे कलाकार तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश मोतलिंग व निर्माती सेजल एस. उपस्थित होते.
‘पावडर’ ही एक लवस्टोरी आहे. सिध्दार्थ जाधव, संतोष जुवेकर, गिरीजा जोशी या कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.