पोर्ट लुई दि.२७ – भारतीय उद्योजकांनी मॉरिशसमध्ये यावे, येथे त्यांचे उद्योग उभारावेत असे आग्रहाचे निमंत्रण मॉरिशसच्या सरकारने केले आहे. मॉरिशसचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री झेविअर डुवल या संदर्भात म्हणाले की मॉरिशसमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या मोठी आहे त्याचप्रमाणे येथे यापूर्वी अनेक भारतीय उद्योजकांनी आपले उद्योग सुरू केलेही आहेत.
ते म्हणाले की भारताशी आमची नाळ फार पूर्वीपासून जोडलेली आहे. आणि भारताशी आमचे आर्थिक संबंधही सलोख्याचे आहेत. भारतीय उद्योजकांना जर आफ्रिकी देशात गुंतवणूक करायची असेल तर ती आमच्यामार्फत करावी अशीही आमची इच्छा आहे. भारतीय उद्योजकांनी मॉरिशसचा वापर आफ्रिकेचे प्रवेशद्वार म्हणून करावा अशी आमची अपेक्षा आहे व त्यासाठी कर माफी व अन्य सवलती आम्ही देऊ करत आहोत. भारतीय कंपन्या भविष्यात शिक्षण, सूचना प्रसारण, बीपीओ, चिकित्सा, आणि खाण उद्योगात गुंतवणूक करू शकतात.
भारतीय चित्रपट सृष्टीसाठीही मॉरिशसची दारे उघडी आहेत असे सांगताना डुवल म्हणाले की ज्या भारतीय चित्रपटांचे येथे शूटिंग केले जाते त्याच्या खर्चाच्या ३० टक्के रक्कम आम्ही त्यांना रिफंड म्हणून देत आहोत.