बर्लिन दि.२७ – अॅपलचा संस्थापक सदस्य स्टीव्ह जॉब्ज आणि त्याचा साथीदार स्टीव्ह वोज्नियाक यांनी बनविलेल्या पहिल्या वहिल्या संगणकाला लिलावात तब्बल ३ कोटी ७० लाख २० हजार ५६० रूपये इतकी प्रचंड किंमत मिळाली आहे. आपल्या कंपनीसाठी जॉब्जने बनविलेला हा पहिला संगणक १९७६ सालात बनविला गेला होता. त्यावेळी त्यासाठी ६६६ डॉलर्स इतकी किमत ठरविली गेली होती.
त्यावेळी विकल्या जाणार्या संगणकांत फक्त सर्कीट बोर्ड ग्राहकाला दिला जात होता व मॉनिटर, की बोर्ड व संगणक केस ग्राहकांना स्वतंत्र रित्या विकत घ्यावी लागत असे असे सांगितले जात आहे. अॅपलच्या या पहिल्या संगणकाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यावर स्टीव्ह वोज्नियाक याची सही आहे. त्याचा की बोर्ड लाकडाचा आहे आणि स्टीव्ह जॉब्जचे जुने बिलही या संगणकासोबत ग्राहकाला देण्यात आले आहे.
जर्मनीतील प्रसिद्ध लिलाव कंपनी ब्रेकर ने हा लिलाव केला असून त्यांच्या मते या मॉडेल्सचे जगात चालू स्थितीत असलेले फक्त सहा संगणक आहेत. गेल्या वर्षी त्यांनी याच मॉडेलच्या संगणकाचा लिलाव केला होता व तो ४ लाख डॉलर्सना विकला होता.