पैजेचा विडा

ज्ञानेश्‍वरांच्या काळात मराठी भाषेला प्रतिष्ठा नव्हती पण त्यांनी मराठीत गीतार्थ सांगितला. मराठी भाषेत ते सामर्थ्य आहे असा विश्‍वास त्यांना होता आणि तोच लोकांना सांगताना ते म्हणाले, माझा मर्‍हाटाची बोलू कवतिके, अमृतातेही पैजा जिंके. मराठी भाषा गोडीच्या बाबतीत अमृताशी बरोबरी करील याची खात्री देताना माऊलींनी, ही भाषा अमृताशी पैज लावून ती जिंकेल असे म्हटले आहेे. आपल्या जीवनात आपणही अनेक प्रकारच्या पैजा लावत असतो. पैज लावणे ही मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे. शाळेत जाणारी मुले आणि मुलीही सतत पैजा लावत असतात. आज अमुक एक तास होणार नाही असे एखाद्याला वाटते पण, तो होणार असे दुसर्‍याला वाटतेेेे. त्यावरून त्या दोघांत पैज लागते. पैज काही फार मोठी नसते. एखादी पेन्सील किंवा गोट्यांची देवाण घेवाण होत असेल पण जिथे कसली तरी अनिश्तितता असते तिथे पैज असतेच. अनेक लोक सतत कसला ना कसला जुगार, पैज, शर्यत, स्पर्धा यात गुरफटलेले असतता. दिवसात एखादा सट्टा लावला नाही तर त्यांना जीवन उदास आहे असे वाटायला लागते. असेच लोक क्रिकेटवरही सट्टा लावतात आणि त्याची मात्र सर्वत्र चर्चा होते.

सट्टा हा काही आजचा नाही. महाभारतातही तो होता. महाभारतात तर पांडवांनी आपले राज्य आणि पत्नीही सट्ट्यावर लावली होती. शकुनी मामा काही फासे टाकत होता आणि ते कसे पडतील याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्या अंदाजांवरच सारे काही पणाला लावले जात होते. प्रश्‍न असा आहे की, सट्ट्याने एवढी बरबादी होणार होती तर युधिष्ठिरासारखा धर्मात्मा हा जुगार खेळायला तयारच कसा झाला ? त्या संबंधात असे सांगितले जाते की, ते क्षत्रियाचे कर्तव्य मानले जात होते. एका क्षत्रियाने दुसर्‍याला द्युत खेळायचे आव्हान दिले तर ते आव्हान दुसर्‍या क्षत्रियाने नाकारता कामा नये. तसे ते नाकारणे हा अधर्म समजला जात असे. युधिष्ठिराने तो धर्म पाळला पण तो कोणत्या पातळीला जाऊन पाळला पाहिजे याचे भान त्याला राहिले नाही. सारे काही हरत चाललो आहोत तरीही आपण खेळतच आहोत याचे त्याला भान राहिले नाही. आपल्या धर्मात काही वेळा द्युत आवश्यक मानले गेेलेले आहे. गौरी गणपतच्या आराशीत द्युताचा पट ठेवला जातो. गौरी आवाहनाच्या रात्री गौरी द्युता खेळतात अशी श्रद्धा आहे आणि तिच्याशी इमान राखून आता गणपतीच्या मंडपात पत्त्यांचे डाव मोठ्या प्रमाणावर टाकले जात आहेत.
काही लोक तर वर्षातल्या आपल्या कमायीचा काही हिस्सा गणपतीच्या मंडपात खेळायच्या जुगारासाठी राखून ठेवायला लागले आहेत. त्यांच्यासाठी गणेशोर्तंसव मंडळे टेबलांची व्यवस्था करायला लागले आहेत. त्यासाठी आकारले जाणारे भाडे हे गणेश मंडळांचे उत्पन्नाचे साधन बनले आहे. हा खरे तर जुगारच. तो कायद्याला मान्य नाही पण त्याला गणपतीचा संदर्भ असल्यामुळे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. उगाच पोलिसांनी दखल घेतली तर धार्मिक कार्यात हस्तक्षेप केला म्हणून आरडा ओरडा व्हायचा. मानवाला अंदाज करणे आवडते. ज्या गोष्टीविषयी अनिश्‍चितता असते. तिच्या विषयी अंदाज व्यक्त करणे आणि अंदाजांच्या बाबतीत स्पर्धा लावणे हा अनेकांच्या मनोरंजनाचा विषय झाला आहे. या मानवी प्रवृत्तीला आलेले व्यावसायिक रूप म्हणजे सट्टा. एक साधी मानवी प्रवृत्ती पण तिच्यातून आता करोडो रुपयांची उलाढाल व्हायला लागली आहे. आता शेतीमालाच्या किंमतीबाबत सट्टा चालतो. त्याला तर सरकारची मान्यताच आहे. हातात एक किलोही साखर नसणारे दोन व्यापारी नंतरच्या एका तारखेला साखर काय भाव असेल यावर शर्यत लावतात. त्या संबंधातला अंदाज बरोबर येणारा जिंकतो आणि त्याला काही लाख रुपये मिळतात. हळदीचे असेच व्यवहार चालतात.

रतन खत्री नावाचा एक हिकमती माणूस मुंबईत ठराविक वेळा आपल्या हातातले पत्ते वेडे वाकडे काढून त्यातून काही तरी नंबर काढतो आणि त्यावर देशभरात करोडो रुपये लावले जातात. त्यात अनेकांनी आपली घरे दारे आणि शेती घालवलेली आहे. हा मटका बंद करणे सरकारला कदापिही शक्य झालेले नाही कारण ती मानवी प्रवृत्ती आहे असे सरकारचे म्हणणे आहे. मोठ्या शहरातले किती तरी सट्टेबाज वाट्टेल त्या गोष्टीवर सट्टा लावतात. रस्त्याने जाणारी एखादी कार किती नंबरची असेल यावर ते बसल्या बसल्या जुगार खेळत असतात. त्यावर पैसे घालवतात. येणार्‍या वाहनाचा क्रमांक काहीही असू शकतो. त्याबाबतची अनिश्तितता हा त्यांच्या बेटीचा आधार बनतो. आपल्या जीवनातली सर्वात अनिश्‍चित घटना म्हणजे निवडणूक. तिच्या निकालावर तर करोडो रुपयांचा सट्टा लावला जात असतो. जो उमेदवार निवडून येण्यासाठी कमी पैसे लावले जातात तो नक्की निवडून येणार असे मानले जाते. उमेदवार मंडळी मतदारांना पैसे वाटत आले आहेत. पण मतदार फार चालू झाले आहेत. ते सर्वच उमेदवारांचे पैसे घेतात आणि ज्याला मत द्यायचे आहे त्यालाच देतात. अशा स्थितीत उमेदवारांनी मतदारांशी सट्टा खेळायला सुरूवात केली आहे.

Leave a Comment