नक्षलवाद विरोधी चळवळीला धक्का

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील गरबा घाटी या भागात माओवाद्यांनी गेल्या शनिवार दि. २५ मे रोजी कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेल्या बेछुट हल्ल्यामुळे कॉंग्रेसचे काही नेते मारले गेले. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश हे दोघेही हल्ल्याला बळी पडले. माजी केंद्रीय मंत्री वयोवृध्द नेते विद्याचरण शुक्ल हे गंभीर जखमी झाले. हा हल्ला ऐतिहासिक समजला जाईल कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नेत्यांच्या हत्येस कारणीभूत ठरणारा हल्ला यापूर्वी केवळ छत्तीसगडच नव्हे तर पूर्ण भारतातच कधी झालेला नाही. या हल्ल्यातले सगळ्यात मोठे नुकसान म्हणजे कॉंग्रेसचे नेते महेंद्र कर्मा यांची हत्या. महेंद्र कर्मा यांना छत्तीसगडमध्ये बस्तर का शेर म्हणून ओळखले जात होते. ते स्वतः आदिवासी समाजातून पुढे आलेले होते. नक्षलवादी चळवळीमुळे आदिवासी समाज कसा मागे पडत आहे याची त्यांना तीव्र जाणीव होती. त्यामुळे त्यांनी १९९० सालपासून माओवाद्यांच्या विरोधात जनआंदोलन सुरू केले होते. त्यांच्या या आंदोलनाला २००५ ते २००८ या काळात मोठेच यश मिळाले होते आणि त्यामुळेच ते नक्षलवाद्यांच्या डोळ्यांत सलत होते.

शनिवारी झालेल्या या हल्ल्यामध्ये काही नेते ठार आणि जखमी झाले. परंतु माओवाद्यांचा खरा उद्देश महेंद्र कर्मा यांचा काटा काढणे हाच होता. २०१२ च्या नोव्हेंबरमध्ये त्यांच्यावर असा हल्ला झाला होता. परंतु त्यातून ते बचावले. त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर आणि त्यांचा अंगरक्षक असे दोघे मात्र जखमी झाले. महेंद्र कर्मा आपल्या हातातून निसटल्यामुळे माओवादी चवताळलेले होतेच. परंतु महेंद्र कर्मासुध्दा काही बिचकलेले नव्हते. त्यांनी या हल्ल्यातून बचावल्यानंतर, नक्षलवादी चळवळ संपेपर्यंत तिच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्धार जाहीर केला होता. त्यामुळे तर नक्षलवादी त्यांना मारण्यास टपलेले होते. महेंद्र कर्मा यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली होती. मात्र या उपरही ते मारले गेले. भारताच्या बारा राज्यांमध्ये नक्षलवादी किंवा माओवादी संघटनांचा उपद्रव आहे. परंतु ओरिसा आणि छत्तीसगड या दोन राज्यांत त्यांचा विशेष त्रास जाणवतो. तो कमी करण्यासाठी सरकारचे बरेच प्रयत्न सुरू आहेत. परंतु छत्तीसगडमध्ये सारी परिस्थिती गुंतागुंतीची होत चालली आहे. एका बाजूला काही नक्षलवादी शरणागती स्वीकारून शस्त्रे खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत आहेत. पण ही प्रक्रिया सुरू असतानाच मधूनच या दहशतवाद्यांच्या भावनांचा भडका उडतो आणि कोठेतरी त्यांच्या हातून मोठा हिंसाचार होतो. माओवाद किंवा नक्षलवाद ही चळवळ आपल्या समाजव्यवस्थेतल्या मोठ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून निर्माण झालेली आहे. समाजाच्या एका वर्गाला आपण सामाजिक न्याय देऊ शकलेलो नाही ही वस्तुस्थिती त्याच्या मागे आहे. यातून निर्माण झालेल्या चळवळतीले म्हणजेच माओवादी कार्यकर्ते ग्रामीण भागातल्या सरपंच आणि तत्सम तळागाळातल्या नेत्यांच्या विरोधात अधूनमधून हिंसक कारवाया करत असतात. परंतु त्यांनी २५ मे रोजी मोठ्या प्रमाणावर कॉंगे्रसच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असलेल्या परिवर्तन यात्रेवर हल्ला केला. असा संघटित हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. २००९ साली पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांच्या मोटारींच्या ताफ्यावर असा हल्ला झाला होता आणि त्याच्या पूर्वी २००३ साली आंध्रप्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावरही हल्ला झाला होता. या दोघांचा अपवाद वगळता गेल्या २० वर्षात तरी कोणा राजकीय नेत्यांवर असा नक्षलवादी हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या हल्ल्यामध्ये जवळपास १००० माओवादी सहभागी होते. याचा अर्थ त्यांनी पुरेशा तयारीनिशी हल्ला केलेला आहे. आता उपलब्ध होत असलेल्य माहितीनुसार या माओवाद्यांनी या भागात हल्ल्याची रंगीत तालीमसुध्दा केली होती. परंतु छत्तीसगड राज्य सरकारच्या पोलिसांच्या आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणांना त्याचा पत्ता लागला नाही. हा हल्ला झालेला भाग छत्तीसगडच्या दक्षिणेतला आहे आणि तिथे निबीड अरण्य आहे.

बिजापूर, डांटेवाडा, सुकमा, जगदळपूर आणि बस्तर या जिल्ह्यांचा हा परिसर आहे. छत्तीसगड हे पूर्ण राज्य नक्षलग्रस्त नाही. हा दक्षिण भाग नक्षलग्रस्त आहे. त्यामुळे या भागातल्या घटनांचा सुगावा लागला नाही. पोलीस यंत्रणा गाफील राहिली. कॉंग्रेसच्या नेत्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही परिवर्तन यात्रा काढली होती. तिला सरकारने पुरेसे संरक्षण दिले नाही. असा आरोप कॉंगे्रसचे नेते करत आहेत. त्यात तर तथ्य आहेच. पण कॉंग्रेसच्या नेत्यांनीसुध्दा एवढ्या तीव्र स्वरूपाच्या नक्षलग्रस्त भागातून आपली परिवर्तन यात्रा सुरक्षेविना न्यायला नको होती. विशेषतः या यात्रेमध्ये प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पटेल, माजी आमदार उदयकुमार मुदलियार, माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल असे नेते ज्या यात्रेमध्ये आहेत त्या यात्रेच्या बाबतीत हा बेसावधपणा करायला नको होता. नक्षलवाद्यांचे लक्ष्य महेंद्र कमार् हेच होते. त्यामुळे त्यांच्यापैकी १०० नक्षलवाद्यांनी त्यांच्या गाडीला घेराव केला आणि त्यांच्यावर शेकडो गोळ्यांची बरसात केली. त्यामुळे त्यांच्या शरीराची चाळणी झाली. महेंद्र कर्मा यांनी गेल्या २५ वर्षापासून नक्षलवाद्यांशी झुंज दिलेली आहे. जनआंदोलन संघटित करून आणि वेळप्रसंगी नक्षलवाद्यांच्या गोळीला गोळीने उत्तर देऊन त्यांना कसे संपविता येईल याचा प्रयत्न कर्मा यांनी केलेला आहे. देशातल्या काही राज्यांमध्ये नक्षलवाद्यांचा त्रास आहे. परंतु त्यांच्या विरोधात छत्तीसगड वगळता अन्य कोणत्याही राज्यामध्ये सल्वा जुदूम सारखी चळवळ उभी राहिलेली नाही. महेंद्र कर्मा यांच्या हत्येने या चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Comment