शतायुषी जोडप्याच्या विवाहाची ८७ वर्षे पूर्ण

लंडन दि.२५ – पंजाबमध्ये १९२५ सालात विवाहबद्ध झालेले करमचंद आणि करतारी देवी या जोडप्याच्या विवाहाला तब्बल ८७ वर्षे पूर्ण झाली असून ब्रॅडफोर्ट येथे सुमारे सत्तेचाळीस वर्षांपूर्वीच स्थायिक झालेल्या या जोडप्याची दखल खुद्द ब्रिटनच्या महाराणीने घेतली आहे. त्यांच्या सहजीवनाची ८७ वर्षे साजरी करण्यासाठी राणीने त्यांना मेजवानीसाठी बकींगहॅम पॅलेस येथे निमंत्रित केले होते आणि या मेजवानीला डचेस केट मिटलटन उपस्थित होती असे समजते.

वयाची शंभरी ओलांडलेले १०७ वर्षांचे करमचंद आणि त्यांच्या शंभरी गाठलेल्या पत्नी करतारीदेवी यांचे पॅलेसमध्ये शाही स्वागत करण्यात आले. या दोघांच्या वैवाहिक जीवनात कधीच वादविवाद न झाल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. या जोडप्याला ८ अपत्ये आहेत आणि २८ नातू पणतू आहेत असे समजते. १९६५ मध्ये त्यांनी ब्रिटनला स्थलांतर केले होते.

Leave a Comment