जागे व्हा असा संदेश देऊन अण्णांची जनयात्रा संपन्न

रूद्रपूर- उत्तराखंड दि.२५- भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रणेते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या जनतंत्र यात्रेचा दुसरा टप्पा काल रूद्रपूर येथे पूर्ण केला. देशातील सत्ता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात गेली आहे त्यामुळे जागे व्हा आणि ही सत्ता बदलण्याचा प्रयत्न करा असे आवाहन यावेळी सभेत बोलताना अण्णांनी केले.

संसदेत १६२ खासदार गुन्हेगारीचे आरोप असलेले आहेत असे सांगून ते म्हणाले की भ्रष्टाचारी सत्तेपासून आता देशाला बदल हवा आहे. लोकशाही पद्धतीत जनतेच्या हातातच खर्याट चाव्या असतात तेव्हा २०१४ च्या लोकसभा निवडणकीत योग्य उमेदवाराला मतदान करा. युवा पिढीने या आंदोलनात सामील व्हावे असे आवाहनही अण्णांनी यावेळी केले.

अण्णांनी या टप्प्यात ५० गावांतून सार्वजनिक सभा घेतल्या आहेत. लवकरच दिल्लीच्या रामलिला मैदानावर नवी मोहिम हाती घेण्यात येत असल्याचेही अण्णांनी यावेळी जाहीर केले.