‘देऊळ’ चित्रपटातील आपल्या कसदार अभिनयाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून अल्पावधितच हरहुन्नरी कलाकार म्हणून नावलौकिक कमावलेल्या गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. गिरीश कुलकर्णी यांनी आता हिंदी चित्रपटश्रुष्टीतही धडाकेबाज पदार्पण केले असून त्यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अग्ली’ हा हिंदी चित्रपट नुकताच ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. या महोत्सवासाठी गिरीश कुलकर्णी यांना खास आमंत्रित करण्यात आले होते.
गिरीश कुलकर्णी यांचा ‘अग्ली’ चित्रपट ‘कान्स’म्ध्ये
प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा ‘अग्ली’ हा चित्रपट असून ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात ‘अग्ली’ शिवाय अनुराग कश्यप यांच्या ‘बॉम्बे टौकीज’ आणि ‘डब्बा’ या आणखी दोन चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ‘अग्ली’ हा अपहरण नाट्यावर आधारित ‘थ्रिलर’ चित्रपट
असून त्यामध्ये गिरीश कुलकर्णी यांच्याखेरीज तेजस्विनी कोल्हापुरे आणि रोनित रॉय यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.
आपल्या ‘वळू’ या पहिल्या चित्रपटापासूनच लेखन आणि अभिनय यामध्ये स्वत:चे साधारण वेगळेपण सिद्ध केलेल्या गिरीश कुलकर्णी यांच्या ‘विहीर’, ‘देऊळ’ , ‘मसाला’ या नंतरच्या चित्रपटांनाही चित्रपट रसिकांनी भरभरून दाद दिली होती. गिरीश आणि उमेश कुलकर्णी यांच्या ‘अरभाट निर्मिती’ संस्थेतर्फे निर्माण करण्यात आलेला ”पुणे-५२ ‘ हा चित्रपटही त्यांनी आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयशैलीने चांगलाच गाजविला होता. आपल्या कसदार अभिनयाने ‘देऊळ’ चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार मिळविल्यानंतर गिरीश कुलकर्णी यांना हिंदी चित्रपटश्रुष्टीची दारे आपोआपच उघडली गेली. आणि अनुराग कश्यप यांच्यासारख्या कसबी दिग्दर्शकाने त्यांना आपल्या ‘अग्ली’ या चित्रपटात संधी दिली.
या चित्रपटाची ‘कान्स’ सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाल्याने एक सक्षम अभिनेता म्हणून गिरीश कुलकर्णी यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोंचले असून एका मराठी अभिनेत्याची ही झेप निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल गिरीश कुलकर्णी यांचे सर्वत्र
अभिनंदन होत आहे.
