बसमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटात १७ शालेय विद्यार्थी ठार

इस्लामाबाद दि.२५ – पूर्व पाकिस्तानात शालेय विद्यार्थ्यांना नेणार्‍या एका बसमध्ये गॅस सिलींडरचा स्फोट होऊन शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात १७ विद्यार्थी जागीच जळून ठार झाल्याची घटना घडली. अन्य सात मुले जखमी झाली असून त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले आहे. इस्लामाबाद पासून २०० किमीवर असलेल्या गुजरात या गावी ही घटना घडली.

पोलिस अधिकारी मोहम्मद रशीद यांनी दिलेल्या माहितीनुसार बसमधील सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर बसला आग लागली. त्यात १७ मुले जळून खाक झाली तर ७ जखमी झाली.

पाकिस्तानात शुक्रवारीच संशयित दहशतवाद्यांनी पोलिस ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात ६ पोलिस ठार तर तीन जखमी झाले होते. ही घटना पेशावर पासून जवळ असलेल्या मटानी येथे घडली होती तर त्यापाठोपाठ आत्मघातकी मानवी बॉम्ब बनलेल्या एका व्यक्तीने अफगाणी धर्मगुरूच्या वाहनात घुसून स्फोट घडविला होता. यात धर्मगुरू मशिदीत गेल्याने वाचले मात्र त्यांचा चालक व रक्षक ठार झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही असेही समजते.

Leave a Comment